मुंबई
salman khan बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान हा आपल्या उत्स्फूर्त वक्तव्यांसह हटके अंदाजासाठी कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावरही सक्रिय असलेल्या सलमानची सध्या ‘बिग बॉस 20’ या शोमुळे चर्चा सुरू आहे. त्यातच आपल्या एका मैत्रिणीच्या नव्या कॅफेला शुभेच्छा देताना त्याने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचा संदर्भ देत केलेल्या मिश्कील टिप्पणीने लक्ष वेधून घेतले आहे. कॅफेतील स्वच्छता आणि पदार्थांची गुणवत्ता योग्य राखली नाहीस, तर तपासणीसाठी तुकाराम मुंढे यांना पाठवेन, असा प्रेमळ धाक सलमानने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दाखवला आहे. कोणाचेही नाव स्पष्टपणे न घेता केलेल्या या टिप्पणीमुळे सलमानच्या मिश्कील शैलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सलमान खान आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या नव्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देताना अनेकदा दिसतो. अलीकडेच त्याच्या एका मैत्रिणीने मुंबईतील वांद्रे परिसरात नवीन कॅफे सुरू केले आहे. या कॅफेची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना सलमानने मैत्रिणीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. ‘सृष्टी, माझी कॉफी रिफील करून दे यार.. किंमत वाढवू नकोस. गुणवत्ता आणि स्वच्छता राख, नाहीतर मी त्यांना (तुकाराम मुंढे) पाठवीन. आणि मग It’s Done Sis,’ असे सलमानने म्हटले आहे.
सलमानने यानंतर आपल्या पोस्टमध्ये कॅफेला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. ‘एक दिवस मी इथे माझा ‘Being Human’चा टी-शर्ट आणि जीन्स घालून येईन. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. या व्हिडीओत जी व्यक्ती बोलत आहे, तीच या कॅफेची मालकीण आहे आणि तीच बॅटमॅनही आहे,’ असे त्याने म्हटले. आपल्या मैत्रिणीच्या कॅफेतील एक फोटो पोस्ट करत सलमानने त्यावर ही टिप्पणी लिहिली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धडक कारवाई सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. FDAच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षा, भेसळयुक्त पदार्थ तसेच हॉटेल, बेकरी आणि अन्य आस्थापनांमधील स्वच्छता या मुद्द्यांवर विशेष भर दिला आहे. या संदर्भात राज्यभर करण्यात येत असलेल्या कारवायांमुळे FDAच्या मोहिमेची चर्चा राजकीय वर्तुळापासून मनोरंजनसृष्टीपर्यंत होत आहे. अनेक राजकीय नेते तसेच कलाकारांकडूनही तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या मैत्रिणीला कॅफेतील स्वच्छता आणि गुणवत्तेबाबत दिलेला ‘तुकाराम मुंढेंना पाठवेन’ हा मिश्कील इशारा चर्चेचा विषय ठरला आहे. सलमानच्या या हटके अंदाजामुळे त्याची पोस्ट सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे.