‘स्क्रॅप’ रिक्षांवर कारवाईचा बडगा

५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
मुंबई, 
scrap-rickshaws-maharashtraनियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ‘स्क्रॅप’ रिक्षा कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. अशा प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करण्यासाठी राज्यभरात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत.
 
auto 
स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी सर्रास वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. परिवहन आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे ज्येष्ठ नेते शशांक राव यांच्यासह राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “प्रवाशांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही.
 
स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा बेकायदा वापर करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची बोगस नोंदणी करणे किंवा नियमांचे थेट उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची आता विशेष तपासणी करण्यात येणार आहे. अशा वाहनांवर आणि त्यांच्या मालकांवर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.