पोलिसांच्या शोध मोहीमेत फरार आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
शिरपूर जैन,
stockpile of weapons seized from the accused पोलिस प्रशासनाच्या विशेष कॉम्बिंग मोहिमेदरम्यान एक फायर आर्म्स व इतर दोन प्रकरणांत मिळून तीन आर्म अ‍ॅटच्या कारवाया, दोन दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाया, दोन फरार आरोपी ताब्यात घेणे, संशयित तांदूळ ट्रक ताब्यात घेणे तसेच चोरीच्या दुचाकीबाबत कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान शिरपूर पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
 
stockpile of weapons seized from the accused
 
शिरपूर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी लक्ष्मण मधुकर चव्हाण (रा. पांगरखेडा, ता. मालेगाव) याचा शोध घेवून त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना १ गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुसे, २ लोखंडी धारदार तलवारी, ६ फरशी कुर्‍हाडी, १० लोखंडी सुर्‍या व कोयते, ५०० फूट केबल, केबल कापण्याचे कटर तसेच सायकलच्या चेनपासून बनविलेले लोखंडी गवती शस्त्र असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच जुगनू मुसींग पवार (रा. पांगरीखेडा) यांच्या घराच्या झडतीत एक धारदार तलवार व २४ नग देशी संत्रा भिंगरी दारूचे कॉर्टर, किंमत १ हजार ९२० रुपये, आढळून आले. शिरपूर पोलिस येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी शंकू गोविंदा पवार (रा. वसारी, ता. मालेगाव) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेतली असता विनापरवाना ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे किंमत ९ हजार रुपये, जप्त करण्यात आली.
 
 
कॉम्बिंग कारवाई दरम्यान वसारी गावाजवळ रोडवर अशोक लेलँड कंपनीचा एमएच ३७ टी २५५७ क्रमांकाचा ट्रक आढळून आला. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सतीश महेश कुंजाम (वय २३, रा. लंगापानी, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे सांगितले. ट्रकमध्ये तांदूळ असून तो भंडारा येथे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र तांदूळ मालाबाबत कोणतेही अधिकृत पावतीपत्रक उपलब्ध नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे ट्रक शिरपूर पोलिस ठाण्यात लावण्यात आला असून, याबाबत योग्य ती चौकशी सुरू आहे. चोरीच्या दुचाकीसह आणखी कारवाईमध्ये चांडस येथील गंगाराम यामू चव्हाण यांच्या घराची झडती घेतली असता बजाज पल्सर कंपनीची मोटारसायकल आढळून आली. एमएच ०४ आर ८०३४ क्रमांकाच्या या दुचाकीची किंमत सुमारे २५ हजार रुपये असून, मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
दरम्यान, बोरगाव येथील संशयित अशोक प्रताप चव्हाण (वय ५०) याच्या घराच्या झडतीत लोखंडी तलवार व किराणा साहित्य आढळले. चौकशीत त्याने चांडस येथील किराणा दुकान फोडून साहित्य चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.