नगरसेवक मोटघरेंवर गोळीबार करणारे अटकेत

आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
corporator motghare काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार केल्याच्या घटनेचा उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, एआय तंत्रज्ञान आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गुजरात व छत्तीसगडमध्ये छापेमारी करीत सात आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, एका महिलेसह आणखी चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. व्यवसायातील जुन्या वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी सुपारी देऊन हा गोळीबार केला, अशी माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

corporator motghare
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकुश झनक तोमस्कर (३०), अमित मधुकर ठाकरे (२२), रोमित ऊर्फ पुल्या मुनेश्वर वाहने (२५), ऋषभ ऊर्फ कांच्या भगवती पैथल (३०) हे समतानगर परिसरातील, ऋषभ ऊर्फ छोट्या विशाल नागदेवे (२४, इसासनी), केतन दुर्गाप्रसाद माटे (२४, संत लहानुजीनगर, जरीपटका) आणि कार्तिक बबलू तोमस्कर (२४, चंद्रमणीनगर) यांचा समावेश आहे. २६ ऑगस्टच्या रात्री पावणेएकच्या सुमारास अंकुश तोमस्कर याने भांडेवाडी प्रभाग क्रमांक २६ मधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे (३१) यांच्या निवासस्थानावर चालत्या दुचाकीवरून गोळीबार केला. त्यावेळी अमित ठाकरे दुचाकी चालवत होता. गोळीबारात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपींचा माग काढण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. घटनेच्या वेळी परिसरात सक्रिय असलेल्या संशयित गुन्हेगारांच्या मोबाइलचे लोकेशन तपासण्यात आले. त्यातून पोलिसांना आरोपींचा माग मिळाला. गोळीबारानंतर आरोपी गुजरात आणि छत्तीसगडमध्ये पसार झाले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांच्या सात पथकांना विविध ठिकाणी रवाना करण्यात आले. अखेर वेगवेगळ्या ठिकाणांहून सात आरोपींना अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुपारी घेऊन केला गोळीबार
गोळीबारापूर्वी आरोपींमध्ये मोबाइलवर चॅटिंग झाल्याचे तपासात समोर आले आहे. खिडकीवर गोळी झाडायची की बाल्कनीत अथवा दरवाजावर, यासंदर्भातील चर्चाही या चॅटिंगमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय, सुपारीची रक्कम म्हणून ५० हजार रुपये अंकुशच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आल्याचा पुरावाही पोलिसांच्या हाती लागला आहे.
मात्र, ही सुपारी नेमकी कोणी, का आणि किती रकमेत दिली, याचा उलगडा मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतरच होण्याची शक्यता आहे. तपास सुरू असल्याने मुख्य आरोपीसह फरार आरोपींची नावे जाहीर करण्यास पोलिस आयुक्तांनी नकार दिला. मुख्य सूत्रधाराविरुद्ध तब्बल ४६ गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारी प्रवृत्तीची एक महिलाही या कटात सहभागी असल्याचे समोर आले आहे.
आरोपींवर लागणार मकोका
या प्रकरणात संघटित पद्धतीने गुन्हा घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंधित जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात नगरसेवक मोटघरे यांनी परिसरातील नशेच्या व्यवसायाबाबत पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यातही घेतले होते. या पार्श्वभूमीवरच सध्याच्या गोळीबाराचा तपास केला जात आहे. पत्रकार परिषदेला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह नवीनचंद्र रेड्डी, सहायक उपायुक्त वैभव जाधव, निरीक्षक विनायक गोल्हे, बाबुराव राऊत आणि शुभांगी देशमुख उपस्थित होते.