लॉरीवर कार आदळून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
त्रिशूर
thrissur road accident केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. मध्य केरळमधील कैपमंगलम परिसरातील पनंबिक्कुन्नु येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. कारमधील सर्व आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. मृतांपैकी सर्व जण शेजारील तमिळनाडू राज्यातील विद्यार्थी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
 
 
thrissur road accident car collides with parked lorry, 8 tamil nadu students killed
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजून ४० मिनिटांनी हा अपघात झाला. गुरुवायूरहून कोडुंगलूरच्या दिशेने जाणारी ही कार कैपमंगलमच्या पनंबिक्कुन्नु परिसरातील महामार्गावर उभ्या असलेल्या लॉरीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारमध्ये प्रवास करणाऱ्या आठही जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात हलविण्यात आले.
अपघातग्रस्त कार तमिळनाडूमध्ये नोंदणीकृत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कारमधून प्रवास करणारे सर्व जण तमिळनाडूतील विद्यार्थी असल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, अशाच प्रकारचा भीषण अपघात काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात झाला होता. गोहद चौराहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छीमका गावाजवळ मजुरांनी भरलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली होती. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू, तर २२ जण जखमी झाले होते. धानाची लागवड करून परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१९ वर हा अपघात झाला. त्यावेळी पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला होता.