मतदारांना व्हॉट्सॲपवर घरपोच मिळणार नोटीस

सुनावणी २० सप्टेंबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
नागपूर, 
voter-list-sir-nagpurमतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदारयाद्यांमधील नावे तपासण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मॅपिंग न झालेले आणि माहितीतील तफावत असलेल्या ८.६५ लाख मतदारांना व्हॉट्सॲप आणि प्रत्यक्ष घरपोच नोटीस पाठविली जाणार आहे. या सर्व मतदारांची सुनावणी २० सप्टेंबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच ४० दिवसपर्यंत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
३१ लाख ९५ हजार ७८ मतदारांचा समावेश
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत (एसआयआर) माध्यम प्रतिनिधींशी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, प्रारूप याद्यांमध्ये जिल्ह्यातील ३१ लाख ९५ हजार ७८ मतदारांचा समावेश झाला आहे, तर १४ लाख ४३ हजार ५११ मतदारांचे गणना प्रपत्र जमा न झाल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून, त्यांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.

sir 
एसआयआरअंतर्गत ४ लाख १८ हजार १२ (९.०१ टक्के) मतदारांचे २००२ च्या मतदार यादीसोबत मॅपिंग झालेले नाही. तसेच, ४ लाख ४७ हजार ८७४ (९.६६ टक्के) मतदारांच्या नाव, आडनाव आणि वयात विसंगती आढळून आली आहे. या सर्व मतदारांना आता नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यांची सुनावणी घेतली जाणार आहे.
१४ लाख ४३ हजार ५११ मतदार आढळले नाहीत
नागपूर जिल्ह्यात एसआयआर मोहीम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत राबवण्यात आली. त्यात ३१ लाख ९५ हजार ७८ मतदारांनी नोंदणी अर्ज भरून दिले. १४ लाख ४३ हजार ५११ मतदार आढळले नाहीत. यात ५ लाख ४५ हजार ६४७ गैरहजर, ५ लाख २९ हजार ९५४ स्थलांतरित, २ लाख ४० हजार ३२७ मृत, तर १ लाख १८ हजार ९९ अन्यत्र नोंदणी किंवा दुबार मतदार आहेत. तर ९,४८४ मतदारांनी माहितीच दिली नाही. ४ लाख १८ हजार १२ मतदारांचे २००२ च्या यादीसोबत मॅपिंग झाले नसून, ४ लाख ४७ हजार ८७४ मतदारांच्या नावात, आडनावात किंवा वयात फरक आहे.
मतदान केंद्रावर नाव शोधता येईल
मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात आली असून, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून, आयोगाने दिलेल्या वेबसाईटवर बघता येणार आहे. ceo.maharashtra.gov.in, voters.eci.gov.in यावर मतदारांना आपले नाव शोधता येईल. त्याचप्रमाणे तुमच्या भागातील बीएलओकडे यादी असेल. त्यांच्याकडूनही माहिती घेता येईल.