प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ : तेलतुंबडे

जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या दालनात बैठक

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
वर्धा,
wardha news आरोग्य कर्मचार्यांच्या वेतनापासून ते पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती, सेवानिवृत्ती लाभ, रिक्त पदे भरणे तसेच वेतन निश्चिती आदी विविध प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, या मागण्यांवर समाधानकारक व ठोस उत्तर न मिळाल्याने आरोग्य कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे मुख्य सल्लागार सिद्धार्थ तेलतुंबडे यांनी दिला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात झालेल्या संघटनेच्या प्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते.
 
 
आरोग्य कर्मचार्यांना दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचार्यांचे लाभ २० दिवसांत देण्यात यावे, रिक्त असलेल्या आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सहाय्यकांच्या पदांवर पात्र कर्मचार्यांना तातडीने पदोन्नती देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाच्या शिफारशीनुसार आरोग्य कर्मचार्यांची वेतन निश्चिती करून त्यानुसार मिळणारा वेतन फरक व थकबाकी संबंधित कर्मचार्यांना तातडीने देण्यात यावी, आदी मागण्या लावून धरल्या. बैठकीला जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप उटाणे, कार्याध्यक्ष वंदना उईके, बाबाराव कनेर, अविनाश चव्हाण, अमित कोपुलवार, दिलीप धुळे, विकास माणिककुडे, भीमराव खुडे, आदी उपस्थित होते.