चिंचिनाडा
godavari river आंध्र प्रदेशातील चिंचिनाडा येथे एका कुटुंबातील चार जणांनी पुलावरून गोदावरी नदीत कथितरीत्या उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला असून, एका महिलेला स्थानिक मच्छिमारांनी वेळीच मदत करत सुखरूप बाहेर काढले. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास संबंधित कुटुंबाने चिंचिनाडा येथील पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. रविवारी राबविण्यात आलेल्या शोधकार्यात तीन मृतदेह पोलिसांच्या हाती लागले, तर स्थानिक मच्छिमारांनी एका महिलेला नदीतून सुरक्षित बाहेर काढले.
बचावलेल्या महिलेची ओळख ४२ वर्षीय नंबूरी पद्मिनी अशी झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रजोल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलिसांना दोन मोटारसायकलीही आढळून आल्या. त्यांच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे संबंधित कुटुंब हे तनुकू शहरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आता नंबूरी पद्मिनी यांच्या इतर नातेवाईकांचा शोध घेतला जात असून, त्यांना या घटनेची माहिती देण्याचे काम सुरू आहे.
या घटनेत पद्मिनी यांचे ४५ वर्षीय पती नंबूरी श्रीनिवास तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृतदेह शोधमोहिमेदरम्यान बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, या कुटुंबाने नदीत उडी घेण्याचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेमागील नेमके कारण godavari river शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांनी कथितरीत्या जीवन संपविण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. बचावलेल्या नंबूरी पद्मिनी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर या घटनेमागील कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी दिल्लीतील संजय झीलमध्येही बुडण्याची दुर्घटना घडली होती. या घटनेत २२ ते २५ वर्षे वयोगटातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यापैकी एक तरुण आंघोळ करण्यासाठी झीलमध्ये उतरला होता. तो बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अन्य दोन तरुणही पाण्यात उतरले; मात्र तिघांचाही बुडून मृत्यू झाला.