अनिल कांबळे
नागपूर,
assistant police inspector राज्यात पोलिस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उणिव असल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर तपासाचा भार होता. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने १०२३ सहायक पोलिस निरीक्षकांची पदोन्नतीची यादी जाहीर केली आहे. बहुप्रतीक्षेत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांना येत्या दिवाळीत पदोन्नतीचे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक दर्जाची अनेक पदे रिक्त आहेत. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावरच गुन्ह्याचा तपास, चौकशी, बंदोबस्त, न्यायालयीन प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेचा भार आहे. अधिकाऱ्यांची उणिव लक्षात घेता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नतीसाठी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागाने राज्यातील १०२३ सहायक पोलिस निरीक्षकांची पदोन्नतीसाठी माहिती मागितली आहे. त्यानुसार आता विहित नमुन्यात वचननामा देऊन महासंचालक कार्यालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सहायक निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागाचा ताळमेळ बसत नव्हता. त्याचा फटका राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना बसला.
सत्र १०८ पर्यंत होणार पदोन्नती!
गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १०५ पर्यंत पदोन्नती देण्यात आली आहे. नव्या पदोन्नतीच्या यादीत १०८ सत्रापर्यंतच्या पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. १०८ सत्रामध्ये अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे दोन टप्य्यात पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
ठाणे-मुंबईतील सर्वाधिक अधिकारी
राज्यातील सहायक पोलिस आयुक्त पदांसाठी नुकताच पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर आता रिक्त पदे आणि डिसेंबरपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करता पदोन्नती देण्यात येणार आहे. पदोन्नतीच्या यादीत ठाणे आणि मुंबई या शहरात कार्यरत असलेल्या सर्वाधिक सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नाशिक आणि पुण्याचा समावेश आहे.