चेन्नई
chennai murder तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक कन्नन याने नुकताच सत्ताधारी TVK पक्षात प्रवेश केला होता. शनिवारी रात्री बेसंत नगर परिसरातील वन्ननदुरई येथे सहा जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी कन्ननवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कन्ननचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संपूर्ण हल्ल्याची घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नन घरातून बाहेर पडून रामास्वामी अॅव्हेन्यू येथे असलेल्या आपल्या कार्यालयाकडे जात असताना टोळीने त्याला गाठले. सहा जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला करत धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. हल्ला इतका भीषण होता की कन्ननचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शास्त्री नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कन्ननचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच विशेष पथके तयार केली आहेत. घटनास्थळाच्या आसपास असलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सध्या पाच संशयितांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे, तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, कन्ननचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. आठ वर्षांपूर्वी याच परिसरातील शिवा आणि वेलु यांच्या हत्येप्रकरणी कन्ननविरुद्ध गुन्हा दाखल असून, हे प्रकरण त्याच्याविरोधात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या हत्येमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.
कन्ननने नुकताच TVK पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्या राजकीय प्रवेशाचा आणि हत्येचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. CCTV फुटेज आणि संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.