काठमांडू,
Everest is melting due to urine daily जागतिक तापमानवाढीसोबतच माउंट एव्हरेस्टवर वाढणाऱ्या मानवी हालचालींमुळे अत्यंत संवेदनशील मानली जाणारी खुंबू हिमनदी (ग्लेशियर) वेगाने वितळत असल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे. नेपाळी आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या ताज्या संशोधनात बेस कॅम्पवरील गिर्यारोहकांची गर्दी, तंबूंमधून निर्माण होणारी उष्णता आणि मानवी मूत्र या घटकांमुळे हिमनदीचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. 'रिजनल एन्व्हायर्नमेंटल चेंज' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, या सर्व मानवनिर्मित कारणांमुळे प्रत्येक गिर्यारोहण हंगामात तब्बल २,५०० टन बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असून भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

२०२३ च्या हंगामातील आकडेवारीचा अभ्यास केला असता, उंच ठिकाणी पाण्याच्या वाढत्या वापरामुळे गिर्यारोहकांनी दररोज सरासरी ६,७६६ लिटर मूत्र विसर्जित केले. मानवी शरीरातून बाहेर पडताना मूत्राचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते, मात्र ते वेगाने थंड होते. अभ्यासानुसार या उष्णतेचा बहुतांश भाग हवेत किंवा खडकांमध्ये विरून जातो, तरीही मानवी क्रियाकलापांमुळे एकाच हंगामात सुमारे १५४ टन हिमनदीचा बर्फ थेट वितळतो. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की मानवी मूत्र हे बर्फ वितळण्याचे एकमेव कारण नसले तरी, बेस कॅम्पवरील एकूण मानवनिर्मित उष्णतेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
सध्या एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये दरवर्षी सुमारे १,६०० तंबू उभारले जातात. तेथील स्वयंपाकघर, जनरेटर, वाय-फाय आणि गरम पाण्याच्या शॉवरसारख्या आधुनिक सुविधांमुळे जमिनीचे तापमान सातत्याने वाढत आहे. हिमालयातील तापमान इतर प्रदेशांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत असून २००० सालापासून बर्फ वितळण्याचा वेग थेट दुप्पट झाला आहे. खुंबू ग्लेशियर बेस कॅम्प परिसरातील पृष्ठभागाचे तापमान दरवर्षी ०.२८ अंश सेल्सिअसच्या दराने वाढत असल्याने, हे संकेत भविष्यातील मोठ्या पर्यावरणीय संकटाची नांदी ठरत आहेत.