धाराशिव
meghna bordikar सार्वजनिक सण आणि उत्सवांमध्ये डीजे तसेच लाऊडस्पीकरचा वापर करू नये, अशी भूमिका पुण्यातील विद्यानंद बापट यांनी घेतल्यानंतर राज्यात डीजेबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत असल्यास डीजे वाजवणे अथवा लाऊडस्पीकर लावणे बलप्रयोगाने थांबवले पाहिजे, अशी भूमिका बापट यांनी मांडली आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना या भूमिकेमुळे पुण्यासह मुंबई आणि राज्यभरात डीजेच्या मुद्द्यावर चर्चा रंगली आहे.
पुण्यात या विषयावर दोन वेगवेगळे मतप्रवाहही समोर आले आहेत. एका गटाकडून डीजे, स्पीकर तसेच ढोल-ताशांच्या वापराचे समर्थन केले जात आहे, तर दुसऱ्या गटाने ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत डीजे बंद झाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे. अशातच आता भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी डीजेबंदीला पाठिंबा दर्शवला असून, डीजेमुळेच गेल्या वर्षी आपल्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मेघना बोर्डीकर आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी डीजेबंदीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकाने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘‘गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे meghna bordikar मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे. परंतु लोकांना ते मान्य नाही. डीजेमुळे घातक परिणाम होऊ शकतात, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे,’’ असे बोर्डीकर यांनी म्हटले.सण आणि उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उत्सव साजरा करताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. ‘‘डीजेवर बंदी घालणे योग्य आहे. डीजे वाजवायला नको. आपण सगळे सण, उत्सव साजरे केले पाहिजेत; परंतु त्यापासून त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे,’’ अशी भूमिका मेघना बोर्डीकर यांनी मांडली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अप्रत्यक्षपणे डीजेचा वापर टाळण्याचे आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. पुण्याचे नागरिक सुजाण असून, ते आपली परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे, ध्वनिक्षेपक आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा आता अधिकच तापण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर डीजेबंदीबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि नागरिक या निर्बंधांना कसा प्रतिसाद देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.