विठोलीतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पेयजल

आरओ प्लॅट चे लोकार्पण

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
मानोरा,
inauguration of the ro plant वाशीम जिल्ह्य निवासी अविनाश मारसेटवार यांच्या पुढाकारातून तसेच दानशूर व्यक्ती राजेश शहाणे, अतुल राठी, गुणवंत सावंत यांच्यासह इतर दानशूर व्यक्तींनी शाळेसाठी दिलेल्या लोकवर्गणीतून पीएम श्री जिप प्राथमिक शाळा, विठोली येथे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, शुद्ध व निर्धोक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अत्याधुनिक आरओ प्लँटची उभारणी करण्यात आली आहे. या प्लँटचे लोकार्पण पं. स. मानोरा यांच्या गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले.

inauguration of the ro plant
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या परिसरात स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण झाल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा निरीक्षक, वाशीम बरडे, गटशिक्षणाधिकारी विलास जाधव, विस्तार अधिकारी अनिल पवार, केंद्रप्रमुख ताराचंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल राठोड व उपाध्यक्ष गोपाल चांदोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हा पीएम श्री शाळेच्या विकासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेला हा आरओ प्लँट शाळेच्या भौतिकसुविधांमध्ये मोलाची भर घालणारा असून, ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा उपक्रम ठरला आहे.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन शाळेतील सर्व शिक्षकवृंदाने केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक अर्जुन लोंढे यांनी उपस्थित मान्यवर, दानशूर व्यक्ती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व सर्व सहकार्‍यांचे आभार मानले. लोकवर्गणीतून उभारलेल्या या आरओ प्लँटमुळे विठोली शाळेतील विद्यार्थ्यांना आता नियमितपणे स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, समाज आणि शाळा यांच्या सहकार्याचे हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे.