International recognition of Tukaram Mundhe गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली महाराष्ट्रातले कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते सरकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नोंद एव्हाना आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनीही घेतली आहे. असे अधिकारी, त्यांची कार्यशैली हा किरकोळ चर्चेचा विषय नाही, तर देशभरात या प्रामाणिक कारभाराचा कित्ता गिरवण्याची गरज आहे. एखाद्या अधिकाऱ्याने सत्याची आणि नियमांची वाट चोखाळायचे ठरवले तर काय घडू शकते, हे यामधून स्पष्ट होते. इतकेच नव्हे, तर कोणत्याही समस्येकडे किंवा सरकारी कामातील त्रुटीकडे अवघ्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे बघायला हवे, याचा वस्तुपाठही येथे मिळतो. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यातील जनतेची मने अल्पावधीतच जिंकली आहेत. नियम आणि कायद्यांची काटेकोर व कठोरपणे अंमलबजावणी करणारा नोकरशहा अशी त्यांची ख्याती आहे. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा अधिकारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देणारा आणि नियम व कायदे याविषयी जनजागृती करणारा हा अधिकारी आहे. म्हणूनच ‘एफडीएचे सिंघम’ म्हणून त्यांनी जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे.

पान टपरीपासून मोठ मोठी नामांकित हॉटेल्स, त्रितारांकित व पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटस, मॉल्स, नावाजलेले क्लब्ज, आईस्क्रीम पार्लर अशा अनेक ठिकाणी एफडीआयच्या टीम्सनी रोज किचन तपासणीचा धडाका लावला. नामांकित मिठाईची दुकाने, डेअरी फार्मची सुद्धा त्यातून सुटका नाही. मंत्रालय आणि विधान भवनाच्या उपाहारगृहाचीही एफडीएने तपासणी केली. अनेक सेलिब्रेटींच्या नावाने हॉटेल्स उभी आहेत. त्यांनाही अशा तपासणीला सामोरे जावे लागले. अशा धाडीनंतर किचनमधील स्वच्छता, शुद्ध पदार्थांचा वापर, शिस्त याचे पालन करण्यासाठी हॉटेलमालकांची धावधाव झाल्याचे बघायला मिळाले. कायद्याचे हात किती लांब असतात, हे तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्त म्हणून महाराष्ट्राला दाखवून दिले. एकावन्न वर्षे वयाचे तुकाराम मुंढे हे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. ते स्वत:विषयी खूप कमी बोलतात. मुंबई प्रेस क्लबने त्यांना नुकतेच वार्तालाप कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्या कार्यक्रमाला सव्वाशे ते दीडशे पत्रकार, टीव्ही वार्ताहर, कॅमेरामन, फोटोग्राफर्स यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला त्यांच्याशी बोलायचे होते, त्यांना प्रश्न विचारायचे होते. एका ज्येष्ठ पत्रकाराने तर त्यांची तुलना अमिताम बच्चन यांच्याशी केली. अनेकांनी त्यांचा उल्लेख ‘सिंघम’ म्हणून केला. तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता आज मोठ्या उंचीवर आहे. पण त्याबरोबर जनतेला त्यांच्याविषयी मोठा आदर आणि आपुलकी वाटत आहे. हे भाग्य फारच थोड्या नोकरशहांना मिळाले असावे. म्हणूनच अशा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कार्याचा आणि कार्यशैलीचा कित्ता देशभरातील अधिकाऱ्यांनी गिरवावा, असे वाटते.
राजकारणी आणि राज्यकर्त्यांनाही तुकाराम मुंढे आपल्या खात्यात येणे अडचणींचे वाटते. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, नाक्यानाक्यावर झळकणारी बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरोधात मोहीम सुरू केली. राजकारण्यांसाठी ती अडचणीची ठरली. महापालिकेत सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव करून त्यांच्या बदलीची मागणी केली. मुंढे यांची बदली झाली, पण त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही. एव्हाना देशाचे वैभव असलेला गणेशोत्सव समोर आहे. गणेशोत्सवात विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप होते. महाप्रसादासाठी परवाना आवश्यक असल्याचे आदेश एफडीएने जारी केले आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी परवाना आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, असा प्रचार करून रक्त जमवले जाते. ते कोणत्या रक्तपेढीला पुरवले जाते, त्यापोटी पैसे दिले जातात का, त्याचा वापर पुढे कसा होतो, हे ठावूक नसते. म्हणून रक्तदान शिबिरासाठी परवाना आवश्यक आहे, असा फतवा एफडीएने काढला आहे. मेडिकलच्या दुकानातील औषधांची आणि पॅकिंगची तपासणीही चालू आहेच. अशी ही तपासणी आणि त्याबाबतची जागरूकता एका राज्यापुरती का मर्यादित रहावी? त्यासाठी जबाबदारी निभावण्याचा हा पॅटर्न देशभर अंगीकारला जायला हवा.