दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये ईशान-कुशाग्रची भक्कम सुरुवात

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
चेन्नई,
duleep trophy final दुलीप ट्रॉफी २०२६ च्या विजेतेपदासाठी पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग आमनेसामने आले आहेत. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण विभागाचे नेतृत्व टिळक वर्मा करत असून, संघात मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांचा समावेश झाल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ईशान किशन आणि कुमार कुशाग्र यांनी डाव स्थिर ठेवला असून, दक्षिण विभागाचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत.
 
duleep trophy final
 
या सामन्यात सर्वाधिक चर्चा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या वैभवने उपांत्य फेरीत सेंट्रल झोनविरुद्ध दमदार फलंदाजी केली होती. बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सीओई मैदानावर झालेल्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ८१ चेंडूंत ९२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही वैभवने ४३ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा पूर्व विभागाला आहे.
 
दक्षिण विभागाच्या संघात सिराज आणि पडिक्कल यांच्या आगमनामुळे संघाची ताकद वाढली आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. देवदत्त पडिक्कलने या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.
 
अंतिम सामन्यासाठी पूर्व विभागाच्या संघात अभिमन्यू इसवरन, वैभव सूर्यवंशी, कुमार कुशाग्र, सुदीप कुमार घारामी, इशान किशन (यष्टीरक्षक), शिखर मोहन, अनुकुल रॉय, एमडी कौनैन कुरेशी, मोहम्मद शमी, अभिजित के. सरकार आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. दक्षिण विभागाकडून रिकी भुई, नारायण जगदीसन (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शेख रशीद, टिळक वर्मा (कर्णधार), स्मरण रविचंद्रन, श्रेयस गोपाल, त्रिपुराण विजय, मोहम्मद सिराज, चामा व्ही. मिलिंद आणि एमडी निधीश हे मैदानात उतरले आहेत.