कल्याणमधील नामांकित प्रिन्स बेकरीला एफडीएचा दणका

लाकडाची भट्टी वापरल्याने बेकरी सील

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
कल्याण
kalyan prince bakery लाकडाची भट्टी वापरून पावाची निर्मिती केल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने कल्याणमधील नामांकित प्रिन्स बेकरीवर मोठी कारवाई केली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळून आल्यानंतर बेकरी सील केली. लाकडाच्या भट्टीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तसेच प्रदूषण वाढत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती.
 

kalyan prince bakery sealed by fda over wood-fired oven and pollution complaints 
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील बेकरी व्यावसायिकांना लाकूड आणि कोळशाच्या भट्ट्यांचा वापर करण्यास मनाई असून, पाव व इतर बेकरी पदार्थांच्या निर्मितीसाठी एलपीजी, पाईप गॅस किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रिन्स बेकरीमध्ये पाव तयार करण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने बेकरीला टाळे ठोकत कारवाई केली.
या कारवाईबाबत बेकरी कर्मचारी नसीम खान यांनी सांगितले की, लाकूड आणि कोळशाचा वापर होत असल्याने संबंधित भट्टी सील करण्यात आली आहे. इतर भट्ट्या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भट्टीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, अद्याप नोटीस पाठवण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून नोटीस मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रिन्स बेकरी सील करण्यात आल्याने परिसरात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चेंबूरमधील kalyan prince bakery नामांकित अशफाक बेकरीवरही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळल्यानंतर या बेकरीचा परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रलंबित आहे. चेंबूरमधील सम्राट अशोक नगर, आर.सी. मार्ग परिसरात असलेल्या या बेकरीची विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती.तपासणीदरम्यानच्या अहवालानुसार, संबंधित बेकरीला एकूण १५६ पैकी केवळ ५६ गुण मिळाले. या निकालावरून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याची नोंद करण्यात आली. कल्याणमधील प्रिन्स बेकरीवरील कारवाईनंतर शहरातील इतर बेकरी व्यावसायिकांमध्येही नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.