खासदार निधीच्या संथ खर्चावर कंगना रणौत संतापल्या

अधिकाऱ्यांना सुनावले, ‘माझ्यापेक्षा तुम्ही चांगला अभिनय करता!’

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
मंडी
kangana ranaut आक्रमक भूमिका आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजप खासदार कंगना रणौत यांनी आता खासदार निधीच्या संथ वापरावरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या कंगना रणौत यांनी ‘डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कोऑर्डिनेशन अँड मॉनिटरिंग कमिटी’च्या बैठकीत MPLADS योजनेअंतर्गत उपलब्ध निधीचा अपेक्षित वेगाने वापर होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीतील कंगना यांच्या संतप्त प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

kangana ranaut lashes out at officials over slow mplads spending: “you act better than me!” 
या व्हिडिओमध्ये कंगना रणौत यांनी खासदार निधीच्या खर्चाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारताना माझ्या खासदार निधीत ११ कोटी रुपये उपलब्ध असताना त्यापैकी केवळ ५० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे. निधीच्या वापरास विलंब का होत आहे, याबाबत त्यांनी बीडीओ स्तरावरील अधिकाऱ्याला थेट प्रश्न विचारले. तसेच आतापर्यंत निधीतून नेमका कोणता खर्च करण्यात आला आहे, त्याचा अहवालही त्यांनी मागितला.
बैठकीत कंगना यांनी अधिकाऱ्यांच्या उत्तरांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘मला फुकटमध्ये या खोट्या गोष्टी सांगू नका. मला प्रत्येक दिशा कमिटीच्या बैठकीत हेच ऐकायला मिळतं,’ अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यापूर्वी दिशा कमिटीच्या बैठकीत MPLADS फंडाबाबत विचारणा केली असता कोणतीही अडचण नसल्याचे तसेच जवळपास ९० टक्के निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष खर्चाचे आकडे आणि बैठकीत सांगण्यात आलेली माहिती यांच्यात ताळमेळ नसल्याचे कंगना यांनी स्पष्ट केले.
‘एक खासदार म्हणून नॅशनल मीडियामध्ये माझ्या कामाची खिल्ली उडवली जात आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टोला लगावताना ‘तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता,’ असेही कंगना यांनी म्हटले.
दरम्यान, MPLADS निधीच्या व्यवस्थापनाबाबत कंगना रणौत यांनी गंभीर आरोप केले. निधीतील ३० ते ४० टक्के रक्कम बनावट लोकांमध्ये वाटण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या पैशांची वसुली होत नसल्याचेही त्यांनी म्हटले. विकास निधीच्या व्यवस्थापनावरून नाराजी व्यक्त करताना कंगना यांनी बैठकीत काही अपशब्दांचाही वापर केला.
मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांच्या मुद्द्यावरही कंगना यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. ‘लोक प्रलंबित असलेल्या विकास योजनांवर रिल्स बनवत आहेत आणि अधिकारी कार्यालयात बसून हसतायत,’ असे त्या म्हणाल्या. मतदारसंघातील रखडलेल्या विकास प्रकल्पांना तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच उपलब्ध खासदार निधीचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.