लग्नात २२ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
किन्शासा
kinshasa लग्नसोहळ्याचा आनंद सुरू असतानाच अचानक लागलेल्या भीषण आगीने क्षणार्धात हाहाकार उडाला. मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोची राजधानी किन्शासा येथील उत्तर किन्शासातील लिंगवाला (Lingwala) परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका इमारतीत लागलेल्या आगीत किमान २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला. लग्नसोहळ्यातील आनंदाचे वातावरण काही क्षणांतच आक्रोश आणि किंकाळ्यांनी भरून गेले.
 
 

kinshasa wedding fire kills 22, several seriously injured in dr congo
आग वेगाने पसरत असताना इमारतीतून बाहेर पडण्यासाठी असलेले मार्ग अत्यंत अरुंद असल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. दाट धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि गुदमरल्याने काहींचा मृत्यू झाला, तर काही जण आगीच्या तीव्र ज्वाळांमध्ये होरपळून मृत्युमुखी पडले. आगीतून बचावलेले नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी जखमींना शक्य ती मदत करत त्यांना कसेबसे इमारतीबाहेर रस्त्याच्या कडेला आणले. त्यावेळी रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह, तर दुसरीकडे मदतीसाठी विव्हळणारे जखमी नागरिक, असे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
लिंगवाला भागाचे महापौर नॉर्बर्ट मुशिंगा (Norbert Mushinga) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री जॅक्वेमिन शबानी (Jacquemin Shabani) यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या दुर्घटनेचे वर्णन अत्यंत दुःखद राष्ट्रीय शोकांतिका असे करत मृतांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाकडून या घटनेचा तपास सुरू आहे. आगीमागील कारण शोधण्याबरोबरच इमारतीतील सुरक्षाव्यवस्था आणि बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गांचीही पाहणी केली जात आहे.
किन्शासासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये अपुऱ्या अग्निशामक यंत्रणा आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सातत्याने गंभीर ठरत आहे. अशा परिस्थितीत आगीच्या दुर्घटना घडल्यास बचावकार्य आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे अधिक आव्हानात्मक ठरते. विशेषतः कोरड्या हवामानाच्या (Dry Season) काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.