रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

चांदाफोर्ट रेल्वे मार्गावरील महालगाव परिसरातील घटना

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
leopard dies गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरील अर्जुनी रेल्वेस्थानक ते वडेगाव रेल्वे स्थानकादरम्यान महालगाव शिवारात रेल्वेची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार ६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृत बिबट्या हा अंदाजे ८ ते १० महिन्याच्या असल्याच्या प्राथमिक अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
 

leopard dies
 
रेल्वे पोल क्रमांक ४०८/१५ जवळ रेल्वे रुळालगत बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या अधिवासातून जाणार्‍या रेल्वेमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. दरम्यान, अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील रेस्क्यू पथक वनाधिकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत रेल्वेच्या धडकेमुळे बिबट्याचे मुंडके व धड वेगळे झाल्याचे आढळून आले.
 
 
वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. बहुरे यांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत्यू अपघाती असल्याची नोंद करण्यात आली आहे. मृत बिबट्याचे शव पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक वन आगारात हलविण्यात आले असून मानक कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान विविध नमुने घेण्यात आले असताना त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. यावेळी उपवनसंरक्षक अविनाश मेश्राम, प्रकोष्ठ निष्कासन अधिकारी, नवेगावबांध, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबार्ते, पशुधन विकास अधिकारी डॉ. कपिल कोरेटी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, हिरवळ बहुउद्देशीय संस्था आणि एस. एस. जे. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.