मुंबई
maharashtra rain alert राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी दडी मारली असून ऑगस्ट महिना बहुतांश भागांसाठी कोरडा गेला आहे. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. पिकांच्या स्थितीकडे लक्ष ठेवून असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. मात्र, पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच पावसाचेही दमदार आगमन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील आगामी पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकणात या कालावधीत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नसला, तरी सप्टेंबरमध्ये परिस्थितीत बदल होऊन चांगला पाऊस होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
१३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असून, काही भागांत शेतातून पाणी बाहेर पडेल इतका पाऊस होऊ शकतो, असे डख यांनी म्हटले आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असून, त्याआधीही राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानेही maharashtra rain alert देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. ७ सप्टेंबर, सोमवारी देशातील तब्बल २२ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या कालावधीत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेता मच्छिमार बांधवांनी या काळात मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने खरीप हंगामासाठी ही स्थिती कितपत दिलासादायक ठरते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.