पूरचे शिवमंदिर अन् काटेपूर्णा अभयारण्य पर्यटनाच्या प्रतीक्षेत

निसर्गाची श्रीमंती, प्रशासनाची उदासीनता

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
सुधाकर क्षीरसागर 
 
मंगरूळनाथ,
mangrulnath news ऐतिहासिक शिवमंदिर, पावसाळ्यात कोसळणारा धबधबा, पूर प्रकल्पाचा जलसाठा आणि जैवविविधतेने समृद्ध काटेपूर्णा अभयारण्य असा निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम मंगरूळनाथ तालुक्यातील पूर परिसराला लाभला आहे. वनोजा गावापासून अवघ्या तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असतानाही अद्याप व्यापक पर्यटन नकाशावर आलेला नाही. निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेले वैभव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आलेली उपेक्षा, असे विरोधाभासी चित्र येथे पाहायला मिळत आहे. नागपूर पुरातत्त्व विभागाकडे पुरातन वास्तू म्हणून नोंद असलेल्या पूर येथील शिवमंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे.
 
 
mangrulnath news
 
मंदिराच्या गाभार्‍यात पाषाणात कोरलेली भव्य महादेवाची पिंड असून, हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरातील भव्य वडाची झाडे, वृक्षसंपदा, पाषाणरचना आणि पक्ष्यांचा किलबिलाट परिसराचे सौंदर्य खुलवतात. पावसाळ्यात मंदिराच्या डाव्या बाजूच्या खोल नाल्यातून कोसळणारा धबधबा या परिसराच्या आकर्षणात भर घालतो. हिरवाईने नटलेला परिसर आणि पुरातन वास्तू यामुळे निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि भटकंती करणार्‍या पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरू शकते.
 
 
मंदिरालगतच काटेपूर्णा अभयारण्याची हद्द सुरू होते. उंच टेकड्या, वनराई, विविध पक्षी आणि वन्यजीव यामुळे या परिसराची जैवविविधता समृद्ध आहे. पूर प्रकल्पाच्या जलाशय परिसरात विविध पाणपक्षी आढळत असल्याने पक्षीनिरीक्षण पर्यटनालाही मोठी संधी आहे. त्यामुळे पूरचे शिवमंदिर, धबधबा, पूर प्रकल्प आणि काटेपूर्णा अभयारण्य यांचा एकत्रित विकास करून धार्मिक, निसर्ग आणि पर्यावरण पर्यटनाचे सर्किट उभारता येऊ शकते.
 
 
मात्र, पर्यटन विकासासाठी आवश्यक मूलभूत सुविधांची येथे मोठी कमतरता आहे. वाशीम जिल्ह्याच्या बाजूने काटेपूर्णा अभयारण्यात अधिकृत पर्यटन प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणी होत आहे. त्यासोबतच पर्यटकांसाठी सुसज्ज वाहनतळ, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षित पायवाटा, दिशादर्शक फलक, माहिती केंद्र, विश्रांतीची व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अभयारण्यातील जैवविविधतेची माहिती देणारे फलक तसेच पक्षीनिरीक्षणासाठी सुरक्षित ठिकाणे उभारल्यास पर्यटकांना या परिसराचा अधिक चांगला अनुभव मिळू शकतो.
 
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग परिसराच्या जवळून जात असून, वनोजा फाट्यावर इंटरचेंजची सुविधा आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यामधून येणार्‍या पर्यटकांना पूर -काटेपूर्णा परिसराशी जोडणे सहज शक्य आहे. महामार्गाची कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनवैभव यांची सांगड घालून या परिसराचा स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. पर्यटन सुविधांचा विकास झाल्यास स्थानिक युवकांना निसर्ग मार्गदर्शक, वाहनसेवा, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि अन्य पूरक व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो.
 
 
त्यामुळे या पर्यटनस्थळाचा विकास हा केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा ठरू शकतो. निसर्गाने वैभव दिले आहे; आता प्रशासनाने सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिक व पर्यटनप्रेमींकडून व्यक्त होत आहे. वनविभाग, पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन पूर-काटेपूर्णा पर्यटन सर्किट प्रत्यक्षात आणावे आणि या दुर्लक्षित पर्यटनस्थळाला जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळवून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.