जालना
maratha reservation row मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषण सुरू केले असून, आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मराठा समाजात सरकारविरोधात संतापाची भावना वाढत असतानाच आरक्षणाच्या प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सरकारच्या पातळीवरील हालचालींनाही वेग आला आहे.
तीन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी सरकारला त्यांच्या सर्व अटी मान्य असल्याचे लाड यांनी सांगितले होते. तसेच जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, ‘‘आधी हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करा, त्यानंतर उपोषण सोडण्याबाबत पाहू,’’ अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती.
या पार्श्वभूमीवर आता अंतरवाली सराटीतून आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे निर्णायक आमरण उपोषण सुरू असतानाच ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनीही अचानक उपोषण सुरू केले आहे. ससाणे यांनी अंतरवाली सराटीत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केल्याने आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकाच गावात एकाच वेळी दोन उपोषणे सुरू झाल्याने जालना जिल्ह्यातील आंदोलनाचे वातावरण आणखी तापले आहे. दोन्ही समाजांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, ‘‘काहीही झाले तरी आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही,’’ असा आक्रमक पवित्रा मंगेश ससाणे यांनी घेतला आहे.एका बाजूला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावत आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मंगेश ससाणे यांनीही उपोषण सुरू केल्याने अंतरवाली सराटी पुन्हा एकदा आंदोलनाचे केंद्र बनले आहे. या घडामोडीमुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासोबतच ओबीसी समाजाची भूमिकाही आक्रमक होताना दिसत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागले आहे.