ग्रँडरोडमध्ये गोदामाला भीषण आग ८ ते १० नागरिकांची सुटका

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
मुंबई
mumbai fire गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली दोन दिवसांपूर्वी बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील ग्रँडरोड परिसरात शनिवारी (५ सप्टेंबर) रात्री आगीची मोठी दुर्घटना घडली. ग्रँडरोड पूर्व येथील राजेंद्रसूरी आराधना भवन संचालित जिनशासन राजेंद्र चॅरिटेबल ट्रस्टमधील मोबाईल ॲक्सेसरीज आणि प्लास्टिकच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
 

mumbai fire massive blaze breaks out at goregaon and grant road, 8 to 10 people rescued 
गोदामात आग लागली त्यावेळी ८ ते १० जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून या सर्वांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर सुमारे सात तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
मात्र आग नियंत्रणात आल्यानंतरही गोदामातील फर्निचर धुमसत होते. त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा पाण्याचा मारा करत धुमसणाऱ्या वस्तूंवर नियंत्रण मिळवले आणि आग पूर्णपणे विझवली.
सदर गोदामाची इमारत दोन मजली असून ती जुनी होती. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोदामात मोबाईल ॲक्सेसरीज आणि प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आगीची तीव्रता वाढली. या दुर्घटनेत गोदामातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास सर्वच साहित्य आगीत जळून खाक झाले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली उभ्या असलेल्या बेस्ट बसला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. मेट्रो स्टेशनच्या खालीच बसने पेट घेतल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. हा धूर मेट्रो स्टेशनमध्येही पसरल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थिती लक्षात येताच प्रवाशांना तातडीने मेट्रो स्टेशनच्या बाहेर काढण्यात आले. बसला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोरेगावमधील बस आगीच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत ग्रँडरोडमध्ये गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबईतील आगीच्या दुर्घटनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.