नप व पोलिस प्रशासनाने केली ‘श्री’ विसर्जन मार्गाची पाहणी

मार्ग होणार अतिक्रमणमुक्त

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
वाशीम,
municipal council आगामी ‘श्री’ विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नप प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, तसेच भाविकांना व गणेश मंडळांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी प्रशासनाकडून मार्गाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पाहणीदरम्यान मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या बाबी तसेच इतर संभाव्य अडचणींची माहिती घेण्यात आली.
 

municipal council
 
मार्गावरील अतिक्रमणे हटवून तो मोकळा करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी मार्गावरील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी, गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे आणि अनुचित प्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाने मिरवणूक मार्ग स्वच्छ व अडथळामुक्त ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे नियोजन केले आहे. पाहणीदरम्यान जिपोअ निलेश खाटमोडे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, ठाणेदार संजय चौधरी, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस विभागाचे कर्मचारी होते.
 
विसर्जन मार्गासाठी प्रशासन सज्ज
मिरवणूक मार्गाची नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडून संयुक्त पाहणी करून मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मार्गावरील नागरिकांशी चर्चा करून सूचना व अडचणी जाणून घेतल्या.
 
 
वाहतूकीचेही होणार नियोजन
श्री विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही अडथळा होऊ नये, मिरवणूकीदरम्यान कोणतीही बाधा येवू नये यासाठी विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. मार्गावरील अतिक्रमणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या बाबी दूर करून रस्ता मोकळा करण्यात येईल. याबाबत नियोजन सुरू असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे.
अरविंद मुंडे, मुख्याधिकारी, न.प. वाशीम