पोलिस विभागाची प्रतिमा मलिन
नागपूर,
nagpur woman traffic सिताबर्डी वाहतूक परिमंडळात कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने झाशी राणी चौकातील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या टेम्पोचालकाकडून दंड घेण्याऐवजी थेट ५०० रुपये घेऊन सोडले. मात्र, पैसे घेतानाचा व्हिडिओ काढल्याचे सांगताच महिला वाहतूक पोलिसाने लगेच टेम्पोचालकावर १५०० रुपयांचा दंड फाडून सावरासावर केली. पाचशे रुपये घेतानाचा महिला वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ शहरभर व्हायरल झाल्यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी सुरु केल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाने दिली.
सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास होऊ नये तसेच वाहतूक पोलिसांनीसुद्धा नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिल्या आहेत. मात्र, अनेक वाहतूक पोलिस चिरीमिरी घेण्यासाठी अजुनही वाहनचालकांशी वाद घालत असल्याचे वाईट अनुभव वाहनचालकांना आले आहेत. डीसीपी आदित्य मिरखेलकर यांनीसुद्धा वाहतूक विभागात पारदर्शकता येण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत डिव्हाईस मशीनची संख्या केली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांची ‘वसुली’ कमी झाली होती. परंतु, पुन्हा डीव्हाईस कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे त्यांना रान मोकळे झाल्याचे बोलले जाते. गेल्या दोन दिवसांपूर्वी झाशी राणी चौकातील वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरून वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्हिडिओमध्ये एका टेम्पोचालकाकडून दंडाच्या नावाखाली सुरुवातीला ५०० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, त्यावेळी कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचा दावा चालकाने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, झाशी राणी चौकात एका महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने टेम्पोचालकाकडून ५०० रुपये घेतल्याचे दिसून येते. पैसे घेतल्यानंतर चालकाने दंडाची अधिकृत पावती मागितली. दरम्यान, चालकाकडे मोबाईल असल्याचे आणि त्याने संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केल्याचे महिला पोलिसाच्या लक्षात आले. कारवाई होण्याच्या भीतीने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने टेम्पो चालकावर १,५०० रुपयांचा दंड केल्याची माहिती समोर आली. ५०० रुपये घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विविध प्रतक्रिया उमटत असून, वाहतूक दंडाची रक्कम घेताना अधिकृत पावती देणे आवश्यक असताना रोख रक्कम घेण्यात आली का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महिला पोलिसाची चौकशी सुरु
झाशी राणी चौकात कारवाई न करता थेट टेम्पोचालकाकडून पाचशे रुपये घेणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक उपायुक्त कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. त्या महिला पोलिसाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्तांनी दिली आहे.