‘नाट्य परिषद करंडक’साठी रंगभूमी सज्ज

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
मुंबई
natyaparishad karandak 2026 रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या उपक्रमांतर्गत भव्य राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन यंदाही करण्यात आले आहे. सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन ‘नाट्य परिषद करंडक’ या स्वरूपात करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.
 
 

natyaparishad karandak 2026 maharashtra’s grand state-level one-act play competition returns 
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कलावंत आणि नाट्यकर्मींना आपली कला सादर करण्यासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अधिकाधिक कलावंतांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर हा स्पर्धात्मक महोत्सव यशस्वीपणे पार पडला होता. त्यावेळी तब्बल २५८ एकांकिका सादर करण्यात आल्या. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री यांनी गावोगावी जाऊन ही शिबिरे घेतली. त्याचा परिणाम अंतिम फेरीतील एकांकिकांच्या दर्जावर दिसून आला. गेल्या वर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करण्यात आले. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यात आले असून आजअखेर त्याचे १०० नाट्यप्रयोग झाले आहेत. त्यापैकी २५ प्रयोग महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये सादर करण्यात आल्याची माहिती प्रशांत दामले यांनी दिली.
दरवर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि कार्यकारी समितीने घेतला आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत एकपात्री स्पर्धा, नाट्यअभिवाचन स्पर्धा तसेच नाट्यसंगीत पदगायन प्रवेश स्पर्धेचेही स्पर्धा महोत्सव आयोजित करण्याचा परिषदेचा मानस आहे.
‘नाट्य परिषद करंडक’ ही स्पर्धा प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबरअखेर महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार असून त्यातून निवड झालेल्या कलाकृतींची विभागीय फेरी होईल. अंतिम फेरी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम येथे पार पडणार आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी विशेष नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असल्याचे परिषदेने सांगितले आहे.
 
 
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या natyaparishad karandak 2026  ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका प्राप्त होतील, त्या ठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे व्यावसायिक रंगभूमीवर रूपांतर व्हावे, यासाठी नाट्य परिषद प्रयत्नशील राहणार आहे.अंतिम फेरीतील एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. लेखन आणि दिग्दर्शनासाठी अनुक्रमे ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची वैयक्तिक रोख पारितोषिके देण्यात येतील. स्त्री अभिनय आणि पुरुष अभिनयासाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा आणि वेशभूषेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांची वैयक्तिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश शुल्क एक हजार रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार असून स्पर्धेची माहिती आणि नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२६ आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी, कलावंत, महाविद्यालये, हौशी संस्था तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.