नीम करोली बाबांची कथा आता जगभर पोहोचणार

‘हनुमान अंश’चा ११ सप्टेंबरला जागतिक प्रदर्शित

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
मुंबई
hanuman ansh नीम करोली बाबांचे नाव घेताच भक्तांच्या मनात महावीर हनुमानांची आठवण जागी होते. या महान संतांची जीवनकथा भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यांनतर आता ती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. नीम करोली बाबा हे भारतातील एक महान आध्यात्मिक संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांनी आणि आध्यात्मिक प्रभावाने स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांसारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींनाही प्रेरणा मिळाली होती.
 

neem karoli baba’s inspiring story goes global with hanuman ansh releasing worldwide on september 11 
भारतीय चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर हिंदी भक्तिपर चित्रपट ‘हनुमान अंश’ आता आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी होम्बले फिल्म्सने स्वीकारली असून, ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
‘हनुमान अंश’ची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. भक्तांकडून भगवान हनुमानांचा अवतार मानले जाणारे नीम करोली बाबा ‘महाराज-जी’ या नावानेही प्रसिद्ध होते. भक्तीला प्रेम, सेवा आणि मानवतेची जोड देणाऱ्या त्यांच्या शिकवणीमुळे त्यांना मोठ्या संख्येने अनुयायी लाभले.
विशेष म्हणजे, नीम करोली बाबांचा आध्यात्मिक प्रभाव भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर पाश्चिमात्य देशांमध्येही तो व्यापकपणे जाणवला. विशेषतः १९६० आणि १९७०च्या दशकात त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले अनेक पाश्चिमात्य साधक भारतात आले आणि त्यांच्या दर्शनासाठी तसेच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांच्याशी जोडले गेले.
दरम्यान, ‘हनुमान अंश’ला hanuman ansh चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वृत्तांनुसार, केवळ १० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या कमाईनंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला. प्रदर्शनाच्या २६व्या दिवसापर्यंत चित्रपटाने ६३.८२ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. दमदार कथानकाला मिळालेल्या सकारात्मक तोंडी प्रसिद्धीमुळे चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांनंतर आता ‘हनुमान अंश’ची कथा जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला कितपत भिडते, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.