तीन वर्षांत ४५ हजार शिक्षकांची भरती

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
भुवनेश्वर
cm mohan charan majhi सोशल मीडियाचा अतिवापर टाळण्याबरोबरच ऑनलाइन माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांची प्राथमिक जबाबदारी ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे, तसेच स्वतःच्या आणि देशाच्या विकासात योगदान देणे ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

odisha cm mohan charan majhi urges students to avoid excessive social media and misinformation 
शिक्षक दिनानिमित्त कटक येथील सेकेंडरी बोर्ड हायस्कूलमध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री माझी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून, माणूस घडविण्याची एक महान प्रक्रिया आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
भारतीय गुरु-शिष्य परंपरेची आजही असलेली प्रासंगिकता अधोरेखित करत मुख्यमंत्री माझी यांनी राज्यातील शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. KG ते PGपर्यंत मोफत शिक्षण, शिशु वाटिका केंद्रांची निर्मिती आणि २,२०० गोदाबरिश मिश्रा आदर्श प्राथमिक विद्यालयांच्या विकासावर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ओडिशा सरकार पुढील तीन वर्षांत शाळांमधील शिक्षकांची ४५ हजार रिक्त पदे भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री माझी यांनी केली. शिक्षण क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने पावले उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
KG ते PGपर्यंत मोफत शिक्षण देणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचा दावा माझी यांनी केला. तसेच, १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून राज्यात २,२०० गोदाबरिश मिश्रा आदर्श प्राथमिक विद्यालये उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, पूर्वप्राथमिक स्तरावरील मुलांसाठी ४५ हजार शिशु वाटिका सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांचा उल्लेख
मुख्यमंत्री माझी यांनी विद्यार्थ्यांसाठी राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचाही उल्लेख केला. यामध्ये मध्यान्ह भोजन योजना, इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शहीद माधो सिंह हात खर्चा योजना यांचा समावेश आहे.कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री माझी यांनी शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी समर्पणाने काम करणाऱ्या अनेक शिक्षकांचा यावेळी सन्मानही करण्यात आला.दरम्यान, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपला अमूल्य वेळ मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी शिक्षण, कौशल्य विकास आणि करिअरच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री माझी यांनी केले. त्याचबरोबर इंटरनेटवर वेगाने प्रसारित होणाऱ्या चुकीच्या आणि भ्रामक माहितीकडे सतर्कतेने पाहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, बिहारमध्ये TRE-4 अंतर्गत ३२ हजारांहून अधिक शिक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.