नवी दिल्ली
onion price relief कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सवलतीच्या दरातील कांदा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असून, विक्री सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या १० दिवसांत देशातील १७ शहरांमध्ये सुमारे चार हजार टन बफर कांद्याची विक्री करण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी रविवारी ही माहिती दिली.
केंद्र सरकारकडे २०२६ या वर्षासाठी भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) यांच्या माध्यमातून १.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा उपलब्ध आहे. कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्पादक राज्यांमध्ये साठवून ठेवलेला हा कांदा मोठ्या प्रमाणावर खप असलेल्या केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासाठी विशेष रेल्वे रॅक ‘कांदा एक्स्प्रेस’ तसेच ट्रकचा वापर केला जात आहे.
किमतींबाबत संवेदनशील असलेल्या निवडक शहरांमध्ये हा कांदा ३५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने ग्राहकांना उपलब्ध करून दिला जात आहे. ‘‘आतापर्यंत १७ शहरांमध्ये सुमारे चार हजार टन बफर कांद्याची विक्री झाली आहे,’’ असे निधी खरे यांनी सांगितले. ‘कांदा एक्स्प्रेस’च्या माध्यमातून दिल्ली आणि चेन्नई येथे कांद्याच्या खेपा पोहोचविण्यात आल्या असून, तिसरी खेप सध्या लोड केली जात आहे. येत्या काही दिवसांत ही खेप गुवाहाटीला पाठविण्यात येणार आहे.
कांद्याच्या दरात किंचित घट
बफर कांद्याच्या बाजारातील वितरणामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, कांद्याच्या किमतीतही थोडी घट झाली असल्याचे निधी खरे यांनी सांगितले. सरकारच्या बफर साठ्यातील कांद्याचा आकार आणि गुणवत्ता ही खासगी व्यापाऱ्यांकडून विकल्या जाणाऱ्या कांद्याप्रमाणेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वर्षाच्या उत्तरार्धात विक्रीसाठी सामान्यतः साठवून ठेवली जाणारी रब्बी कांद्याची पिके काढणीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात प्रभावित झाली होती. त्यामुळे कांद्याच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
एनसीसीएफकडून आतापर्यंत १,५०० टन विक्री
एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी सांगितले की, एकट्या एनसीसीएफने आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये १,५०० टन बफर कांद्याची विक्री केली आहे. किरकोळ विक्रीवर संस्थेचा भर असून, ग्राहकांना ३५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर सध्या ५०.७९ रुपये प्रतिकिलो आहे. २८ ऑगस्ट रोजी सवलतीच्या दरातील कांदा विक्री सुरू झाली, त्यावेळी हाच सरासरी दर ४८.५० रुपये प्रतिकिलो होता. त्यामुळे सरकारच्या बफर साठ्यातील कांदा बाजारात आणून दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत.