‘‘विद्यानंद बापट यांना कोणालाही माहिती नव्हते, तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी डीजेविरोधात भूमिका घेतलेली,’’ असे म्हणत भंडारे यांनी बापट यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बापट सुरुवातीला डीजे आणि लेझरला विरोध करतात, त्यानंतर ढोल-ताशांना विरोध करतात आणि पुढे मिरवणूक या रस्त्यावरून न नेता दुसऱ्या रस्त्यावरून न्यावी, अशी भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली.
‘‘काल-परवा आलेले हे विद्यानंद बापट. डीजेच्या माध्यमातून आले. मी डीजेला विरोध करतोय, मी लेझर लाइटला विरोध करतोय. नंतर-नंतर ते वळणाचं पाणी वळणाला गेलं. ते नंतर म्हणायला लागले, ढोल-ताशा नको, लेझीम नको. ढोल-ताशाला विरोध करणारा भारतीय कसा असू शकतो?’’ असा सवाल संग्राम भंडारे यांनी केला. ‘‘तो महाराष्ट्रीय कसा असू शकतो? मिरवणुकीचे रस्ते बदला, हा बाप झालाय का?’’ अशा शब्दांत त्यांनी विद्यानंद बापट यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, याच आठवड्यात विद्यानंद बापट टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यात डीजेविरोधातील चर्चा आणखी तीव्र झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने डीजेचा मुद्दा आता राज्यातील महत्त्वाचा सामाजिक आणि राजकीय मुद्दा बनला आहे.
नागपूर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात भव्य आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, डीजेच्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि न्यायालयीन निर्देशांचा मुद्दा पुढे आल्याने राज्यात या विषयावर दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र आहे.
दरम्यान, डीजेच्या मुद्द्यावर कायद्याचा थेट बडगा उगारण्याऐवजी लोकसहभागातून आणि नागरिकांना विश्वासात घेऊन तोडगा काढला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापराबाबत प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
संग्राम भंडारे यांनी यापूर्वीही विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवर आक्रमक टीका केली आहे. बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाण याला चांदीचे कडं देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणाही भंडारे यांनी केली आहे. त्यामुळे या वादाला आणखी धार आली आहे.
डीजेविरोधातील भूमिकेमुळे विद्यानंद बापट चर्चेत आले असतानाच त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाचीही चर्चा होत आहे. त्यामुळे डीजेचा मुद्दा केवळ ध्वनिप्रदूषणापुरता मर्यादित न राहता आता सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरत आहे.