‘सण साजरे करा; कशाला पाहिजे डीजे-डॉल्बी?’

राज ठाकरेंचा सवाल; ‘आपण आपली संस्कृती जपली पाहिजे’

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
पुणे
raj thackeray पुण्यातील डीजेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत असून, डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना थेट टीव्ही कॅमेऱ्यासमोर मारहाण झाल्यानंतर या प्रकरणावर राज्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य केले आहे. दरम्यान, आज पुण्यात डीजेविरोधात आंदोलन करण्यात येत असून पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात विद्यानंद बापट सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत.
 

raj thackeray speaks on pune dj controversy, urges people to celebrate festivals traditionally 
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डीजेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘सण साजरे करा… कशाला पाहिजे डीजे, डॉल्बी? पारंपरिक सण नाही का साजरे करता येत?’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला. सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राने देशाला अनेक गोष्टी दिल्या असून, आपण लोकांना किती गोष्टी शिकवल्या आहेत, याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. ‘डीजेवर महिला नाचवण्याची संस्कृती ही उत्तरेची आहे. उत्तर भारतीयांचे आपण कशाला अनुकरण करतोय?’ असा सवाल त्यांनी केला. ‘आमचं लक्ष फक्त धर्माकडे आहे. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे,’ असे म्हणत त्यांनी डीजेच्या वापरावरून आपली भूमिका मांडली.
दरम्यान, राज ठाकरे यांनी अन्य विविध मुद्द्यांवरही भाष्य केले. अविनाश जाधव यांनी आयोजित केलेली दहीहंडी सर्वात उत्कृष्ट होती, असे ते म्हणाले. ‘रोज बोलण्यापेक्षा लिहिलेलं बरं,’ असेही त्यांनी नमूद केले. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या रांगेत कोणीही बसू शकत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारी कार्यालयांमध्ये पंतप्रधानांचा फोटो दुसऱ्या भिंतीवर असावा, तसेच राजकारण्यांचे फोटोही दुसऱ्या भिंतीवर लावावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘तुम्हाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय,’ असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
धर्माच्या मुद्द्यावरून वाद पेटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. ‘देशात सर्वत्र धर्माची झिंग आलेली आहे. काय चालले आहे, कुठे चाललाय आपला देश?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांची माथी भडकवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.
देशाच्या आर्थिक परिस्थितीवरूनही राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘कुणी परदेशात जाऊ नये,’ असे मोदी परदेशातून सांगत असल्याचा उल्लेख करत त्यांनी, ‘GDP वाढला तर सोनं का खरेदी करायचं नाही?’ असा सवाल केला. देशाची आर्थिक स्थिती ढासळत चालली असून अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ५०० परदेशी कंपन्यांनी भारतातील कामकाज बंद केल्याचेही त्यांनी म्हटले.
‘हिंदू-मुस्लिमांनो सजग राहा,’ असे आवाहन करत राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या काळात दंगली होण्याची माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा केला. सोशल मीडिया आता भाजपला भारी पडत असल्याचेही त्यांनी म्हटले.
देशातील लाखो मुले आणि उद्योगपती परदेशात जात असल्याचा दावा करताना, भारतातून परदेशात जाणारी मुले तिथेच स्थायिक होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. १३ हजार उद्योगपती देश सोडून गेल्याचा दावाही त्यांनी केला. चीनमधून बाहेर गेलेल्या ९६ टक्के मुलांपैकी बहुतांश पुन्हा चीनमध्ये परतले, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. ‘४८ मिनिटाला देशात एक शेतकरी जीवन संपवतोय,’ असा दावा त्यांनी केला. विद्यार्थी नैराश्यातून जीवन संपवत असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच नवी मुंबईत हिंदी संमेलन होत असल्याच्या मुद्द्याचाही त्यांनी उल्लेख केला.