जम्मू,
ropeway from Katra to Vaishno Devi श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ नोव्हेंबरपासून वैष्णो देवीसाठीच्या हेलिकॉप्टर सेवांच्या दरात मोठी वाढ होणार आहे. सध्या एकेरी प्रवासाचे भाडे २,३२० रुपये असून त्यात सुमारे ३८० रुपयांची वाढ होऊन ते २,७०० रुपये होणार आहे. तर येण्या-जाण्याचे (रिटर्न) भाडे ४,६५० रुपयांवरून थेट ५,४०० रुपये होईल, म्हणजेच तब्बल ७९० रुपयांची वाढ होणार आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (ATF) दरात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दोन कंपन्यांची ७० हेलिकॉप्टर्स दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ६० ते ७० फेऱ्या मारतात. या भाडेवाढीसोबतच मंदिराच्या यात्रेशी संबंधित सहा मोठे बदल अंमलात आणले जात आहेत.

या नव्या बदलांनुसार, ताराकोट मार्गाजवळील नव्याने उभारलेल्या हट हेलिपॅडवरून आगामी नवरात्रीच्या सुमारास हेलिकॉप्टर सेवा सुरू होत आहे. भविष्यात याच हेलिपॅडवरून कटरा ते शिवखोडी दरम्यानही हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची योजना आहे. सध्या ही सेवा कटरामधील सेर्ली हेलिपॅडवरून सांझी छटसाठी चालवली जाते. तसेच भवन ते भैरव व्हॅलीनंतर आता कटरा ते थेट वैष्णो देवी धाम दरम्यान सुमारे ३५० कोटी रुपये खर्चाचा नवा रोपवे प्रकल्प उभारला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बाणगंगा तपासणी नाक्यापुढे जाण्यासाठी आरएफआयडी (RFID) कार्ड अनिवार्य करण्यात आले असून या डिजिटल प्रणालीद्वारे प्रत्येक भाविकाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
भाविकांच्या आध्यात्मिक अनुभवासाठी श्री माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्र मंडळाने विशेष केशरी वेष्टनात 'पंचमेव प्रसाद' देण्याचा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये सुकामेवा, पवित्र धागा आणि आशीर्वादाचे विशेष नाणे समाविष्ट आहे. पर्यटन आणि मनोरंजनाच्या दृष्टीने पुणे मार्गावरील चिनाब पुलाजवळ चिनाब नदीच्या काठी 'क्रंची क्रूझ रेस्टॉरंट' सुरू करण्यात आले असून, भाविकांना तेथे स्वादिष्ट शाकाहारी भोजनाचा आनंद घेता येत आहे. हवामानाच्या स्थितीनुसार हेलिकॉप्टर सेवेत अधूनमधून बदल होत असले तरी, या सर्व नव्या सुविधांमुळे आणि बदलांमुळे वैष्णो देवीची यात्रा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.