सागर,
11 die due to toxic liquor मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारू सेवनामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांदा ब्लॉकमधील नौरज आणि गुगरा खुर्द या दोन गावांमध्ये शनिवार आणि रविवारदरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली. सागरचे आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची आणि उपचार व्यवस्थेची माहिती घेतली.

घटनेनंतर प्रशासनाने अवैध दारू विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. खबरदारीचा भाग म्हणून परिसरातील सहा दारूची दुकाने सील करण्यात आली असून संबंधित नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत दारूचे सेवन केले असेल आणि त्यानंतर उलट्या, डोकेदुखी किंवा ताप यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारूच्या सेवनानंतर अनेक नागरिक आजारी पडले असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. सध्या इतर बाधित नागरिकांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू आहे. याशिवाय डॉक्टरांचे पथक नौरज आणि गुगरा खुर्द या दोन्ही गावांमध्ये जाऊन नागरिकांची तपासणी करत आहे. कोणालाही संशयास्पद लक्षणे जाणवत असल्यास किंवा गेल्या २४ ते ४८ तासांत मद्यपान केले असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात असून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.