साई किशोरचा फिरकीचा कहर; इंग्लंडमध्ये ७ बळी!

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
चेन्नई,
sai kishores spin havoc इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये भारतीय फिरकीपटू आर. साई किशोरने आपल्या गोलंदाजीने शानदार कामगिरी करत ग्लॉस्टरशायरला डर्बीशायरविरुद्ध २१३ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. विजयासाठी डर्बीशायरसमोर ३१९ धावांचे लक्ष्य होते. मात्र साई किशोरच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव अवघ्या १०५ धावांवर संपुष्टात आला. साई किशोरने केवळ २० धावा देत ५ बळी घेतले. विशेष म्हणजे डर्बीशायरच्या दुसऱ्या डावातील दहाही बळी फिरकी गोलंदाजांनी मिळवले. साई किशोरने पहिल्या डावातही दोन विकेट घेतल्या होत्या.
 
sai kishores spin havoc
 
ग्लॉस्टरशायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली, मात्र सुरुवातीलाच संघाची अवस्था खराब झाली. अवघ्या ३७ धावांत पाच फलंदाज माघारी परतले. त्यानंतर जेम्स ब्रेसीने ११३ धावांची खेळी करत डाव सावरला. विल्यम्सने ४२, तर साई किशोरने २० धावा करत योगदान दिले आणि ग्लॉस्टरशायरचा पहिला डाव २३७ धावांवर संपला. डर्बीशायरकडून ब्रेट रँडलने पाच विकेट घेतल्या, तर बेन एचिसन आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरात डर्बीशायरने २७८ धावा केल्या. मोहम्मद नईमने ११९ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. ग्लॉस्टरशायरसाठी ऑलिव्हर प्राईसने सहा बळी घेतले, तर साई किशोरने २३ षटकांत दोन विकेट मिळवल्या.
 
यानंतर ग्लॉस्टरशायरच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. माईल्स हॅमंडने ११८ धावा केल्या, तर जेम्स ब्रेसीने नाबाद १०४ धावांची खेळी केली. जो फिलिप्सने ६४ धावांचे योगदान दिल्याने ग्लॉस्टरशायरने पाच गडी गमावून ३५९ धावांवर डाव घोषित केला आणि डर्बीशायरसमोर ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना डर्बीशायरचा डाव १०५ धावांतच आटोपला आणि ग्लॉस्टरशायरने सामना २१३ धावांनी जिंकला.
 
या सामन्यात जेम्स ब्रेसीनेही विशेष विक्रम नोंदवला. त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली. १९१९ मध्ये हॅरी स्मिथनंतर एकाच सामन्यात दोन शतके करणारा ग्लॉस्टरशायरचा पहिला यष्टीरक्षक होण्याचा मान ब्रेसीने मिळवला. दुसरीकडे, साई किशोरच्या सात विकेट्सच्या प्रभावी कामगिरीमुळे ग्लॉस्टरशायरच्या विजयात त्याचा मोठा वाटा राहिला.