एसएनए स्पर्श प्रणालीमुळे कर्मचार्यांची गैरसोय
गोंदिया,
samagra shiksha contractual employees समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांचे मागील तीन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने कर्मचार्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मानधनाची प्रक्रिया एसएनए स्पर्श प्रणालीमध्ये अडकून राहिल्याने राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचार्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील ७८ कंत्राटी कर्मचार्यांनाही याचा फटका बसला असून, मानधन रखडल्याने त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

समग्र शिक्षा अभियानाच्या शिक्षण विभागांतर्गत सहायक कार्यक्रम अधिकारी, प्रोग्रामर, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा समन्वयक, विषय साधनव्यक्ती, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ अभियंता तसेच इतर पदांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत. शैक्षणिक कामकाजात महत्त्वाची जबाबदारी पार पाडूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कर्मचार्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने घरभाडे, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. काही कर्मचार्यांना उधारी किंवा कर्जाचा आधार घेऊन दैनंदिन खर्च भागवावा लागत असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. मानधन वितरणासाठी सुरू करण्यात आलेल्या एसएनए स्पर्श प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेमुळे मानधन रखडल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. नवीन प्रणालीमुळे मानधन वितरणात विलंब होत असल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी असून या प्रणालीतील अडथळे दूर करून मानधन वितरणाची प्रक्रिया सुरळीत करावी, शासन व संबंधित विभागाकडे प्रलंबित तीन महिन्यांचे मानधन तातडीने अदा करावे व भविष्यात मानधन वेळेत मिळेल यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जुनी प्रणाली सुलभ व योग्य...
विशेष म्हणजे, एसएनए स्पर्श प्रणाली अंतर्गत ७५ टक्के, १३ टक्के आणि १२ टक्के अशाप्रकारे तिन टप्प्यात मानधन देण्यात येत असल्याने राज्यातील सर्व कर्मचार्यांना त्रास होत आहे. तेव्हा यापूर्वीची पीएफएमएस प्रणालीच अधिक सुलभ व योग्य होती, अशी भावना कंत्राटी कर्मचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शैक्षणिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना आपल्या हक्काच्या मानधनासाठी वारंवार पाठपुरावा करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यासह राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचार्यांचे प्रलंबित मानधन तत्काळ वितरित करावे, त्याचबरोबर एसएनए स्पर्श प्रणालीतून मानधन न करता जुन्या पीएफएमएस प्रणालीतून मानधन देण्यात यावे, अशी अपेक्षा आहे.
- बालकृष्ण बिसेन, जिल्हा समन्वयक, समग्र शिक्षा अभियान, गोंदिया