कॅरिओ,
sara-khalifa-caseमादकपदार्थ तस्करीशी संबंधित एका प्रकरणात इजिप्तच्या एका कनिष्ठ न्यायालयाने वृत्तनिवेदिका सारा खलिफासह १२ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. दोषी ठरवलेले सर्व एका गुन्हेगारी टोळीचा भाग असून, ही टोळी परदेशातून मादकपदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आयात करून मादकपदार्थाची निर्मिती करायचे आणि त्याची देशात तस्करी करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. आरोपींकडून बेकायदेशीर शस्त्रे आणि दारुगोळा देखील जप्त करण्यात आला.
इजिप्तमध्ये मृत्युदंडाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाला देशाच्या ग्रँड मुफ्तींचा धार्मिक सल्ला घेणे आवश्यक असते. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. पोलिसांनी एका घरावर छापा टाकून ७५० किलोग्रॅमपेक्षा जास्त मादकपदार्थ जप्त केले होते. याव्यतिरिक्त, उत्पादनासाठी परदेशातून आयात केलेला कच्चा मालही जप्त करण्यात आला. या प्रकरणातील वीस साक्षीदारांनी सरकारी वकिलासमोर आपले जबाब नोंदवले.
तपासादरम्यान मिळालेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमध्ये रेकॉर्ड केलेली संभाषणे आणि व्हिडीओ क्लिप्सचा समावेश होता. दरम्यान ३९ वर्षीय सारा खलिफा ही एक इजिप्शियन टीव्ही निवेदिका आहे. तिने तिच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या २०२५ च्या अहवालानुसार इजिप्तच्या न्यायालयांनी ४९२ लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि २३ जणांना फाशी देण्यात आली.