टीव्ही होस्ट सारा खलिफाला फाशीची शिक्षा १२ आरोपींना मृत्युदंड

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
कैरो
sara khalifa इजिप्तमधील प्रसिद्ध टीव्ही होस्ट सारा खलिफाला अमली पदार्थांची निर्मिती आणि तस्करी केल्याच्या गंभीर प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कैरो येथील न्यायालयाने सारा खलिफासह या प्रकरणातील एकूण १२ आरोपींना मृत्युदंड ठोठावला आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे न्यायालयीन सुनावणीत समोर आले.
 

sara khalifa sentenced to death in major egypt drug case  
सारा खलिफा ही इजिप्तमधील परिचित टीव्ही व्यक्तिमत्त्व असून ‘मिशन इम्पॉसिबल’ या कार्यक्रमामुळे ती विशेष चर्चेत आली होती. सुरक्षा आणि गुन्हेगारीशी संबंधित विषयांवर चर्चा करणाऱ्या या कार्यक्रमामुळे तिला मोठी ओळख मिळाली. मात्र, आता स्वतः सारा खलिफाच एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणात आरोपी ठरल्याने तिचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
न्यायालयातील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमली पदार्थ तयार करून त्यांची विक्री आणि तस्करी करण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी उभी केली होती. या टोळीचा संबंध सिंथेटिक ड्रग्जच्या निर्मितीशी असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७५० किलोहून अधिक अमली पदार्थ तसेच त्यांच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल जप्त केला. त्याचबरोबर बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळाही पोलिसांच्या हाती लागला.
तपासादरम्यान आरोपींकडून दोन अपार्टमेंट्सचा वापर ड्रग्ज तयार करण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून केला जात असल्याचेही उघड झाले. परदेशातून आयात करण्यात आलेल्या साहित्याचा वापर करून सिंथेटिक ड्रग्ज तयार केले जात होते आणि त्यानंतर त्यांची विक्री तसेच तस्करी केली जात असल्याचे इजिप्तमधील अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सारा खलिफाचा कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकशी तसेच पार्टी आणि इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित प्रोडक्शन कंपनीशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सारा खलिफा आणि इतर काही आरोपींना एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर हल्ला केल्याच्या स्वतंत्र प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे टीव्हीवरील गुन्हेगारी आणि सुरक्षेशी संबंधित विषयांवर भाष्य करणाऱ्या सारा खलिफाचे स्वतःचे नाव आता गंभीर गुन्हेगारी प्रकरणाशी जोडले गेले आहे.