मुंबई
sayani gupta अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सयानी गुप्ता यांना मानहानीच्या प्रकरणात मुंबई दिवाणी न्यायालयाकडून आज अंतरिम दिलासा मिळाला. त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील ‘आसमानी’ या लघुपटासंदर्भात करण्यात आलेल्या कथित कॉपीराइट आरोपांमधून हा वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर मुंबईतील दिवाणी न्यायालयाने गुप्ता यांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने विनिता नेगी यांना सयानी गुप्ता यांच्याविरोधात मानहानीकारक आशय असलेले कोणतेही साहित्य प्रकाशित करणे, प्रसारित करणे किंवा त्याचा प्रसार करण्यास मनाई केली आहे. तसेच मेटा प्लॅटफॉर्म्स आणि विविध माध्यम संस्थांनाही गुप्ता यांच्याविरोधातील मानहानीकारक आशय असलेल्या सर्व पोस्ट तातडीने हटवण्याचे आणि काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘आसमानी’ या लघुपटाची कथा आपल्या अद्याप पूर्ण न झालेल्या माहितीपटाशी साधर्म्य साधणारी असल्याचा आरोप प्रतिवादीकडून करण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला. सयानी गुप्ता यांनी हे आरोप फेटाळून लावत ते “निराधार आणि बोचरे” असल्याचे म्हटले. या प्रकरणात त्यांनी नुकसानभरपाईसह मानहानीकारक आशय हटवण्याची तसेच सार्वजनिक माफी मागून केलेले आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. या कायदेशीर कार्यवाहीत मेटा, रेडिट आणि डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यासह इतर प्रतिवादींचाही समावेश आहे.
गुप्ता यांच्या याचिकेनुसार, एप्रिल २०२६ मध्ये स्क्रीनरायटर्स असोसिएशनकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण अद्याप प्रलंबित असतानाच विनिता नेगी यांनी विविध व्यक्तींना, व्हॉट्सॲप समूहांना तसेच समाजमाध्यमांवर ‘स्टेटमेंट ऑफ सपोर्ट’सह कथितरीत्या चुकीची माहिती प्रसारित केली. गुप्ता यांच्या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींमधील कोणत्याही व्यक्तीने ‘आसमानी’ हा लघुपट पाहिलेला नव्हता. तसेच काही स्वाक्षरीदारांनी संबंधित माहितीपटातील सामग्रीही पाहिलेली नव्हती.याशिवाय, ‘आसमानी’ची निवड झालेल्या चित्रपट महोत्सवांनाही कथित मानहानीकारक ईमेल पाठवण्यात आल्याचा दावा गुप्ता यांनी याचिकेत केला आहे. या ईमेलमुळे लघुपटाच्या प्रदर्शनावर तसेच विविध चित्रपट महोत्सवांमधील संधींवर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा सयानी गुप्ता यांनी केला आहे.