ऑगस्टमध्ये ९,१०० ई-चालान; १.९ कोटींचा दंड

वर्धेत वाहनचालकांवर कडक कारवाई

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
वर्धा,
strict action against motorists in wardha अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असताना अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वर्धा वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून तब्बल ९ हजार १०० ई-चालान करण्यात आले आहे. सोबतच विविध प्रकरणात १ कोटी ९ लाख १४ हजार १५० रुपयांचा दंडही आकारण्यात आला.
 
 
strict action against motorists in wardha
 
शाळा, महाविद्यालये व कोचिंग लासेसमध्ये जाणार्‍या अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी पालकांनाही कारवाईच्या कक्षेत आणले आहे. १८ वर्षांखालील मुलांना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी अथवा चारचाकी वाहन देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालविण्याचे ९४ प्रकरणे नोंदविण्यात आली. या प्रकरणांत ४ लाख ७० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर अल्पवयीनांना वाहन चालविण्यास परवानगी देणारे पालक व वाहनमालक यांच्याविरुद्ध २९८ प्रकरणे दाखल करून त्यांच्याकडूनही ४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, इतर विनापरवाना वाहन चालविण्याच्या ७३१ प्रकरणांत ३६ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
 
 
ऑगस्ट महिन्यात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे ३२ प्रकरणे नोंदविण्यात आली. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत अशा प्रकरणांची संख्या ३७० झाली आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या १३४ वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या हातगाड्या तसेच प्रतिष्ठानांविरुद्धही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. अशा ३५ प्रकरणांत चालान करण्यात आले.
 
 
विशेष अभियानादरम्यान विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सीटबेल्ट न लावणे, विनानंबर प्लेट वाहन चालविणे तसेच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
 
 
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. वाहन चालविताना आढळल्यास मुलासोबतच पालक किंवा वाहनमालकाविरुद्धही कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. रस्ते अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची प्रतिक्रीया वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले यांनी दिली.