मुंबई,
caste validity अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मात्र, ही अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील परिपत्रक काढले. त्यानुसार ४ सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यांत संबंधित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. यापूर्वी २ जुलै २०२६ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रमाणपत्र सादर करताना काही विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आता आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सरकारने यावेळी तीन महिन्यांची मुदत अंतिम संधी म्हणून दिली आहे. त्यामुळे या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढे पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्यावर्षीही वाढविली होती किंमत
जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने प्रवेश प्रक्रियेच्या काळात विद्यार्थ्यांसमोर ही अडचण वारंवार निर्माण होत आहे. मागील शैक्षणिक वर्षातही याच कारणामुळे सरकारला मुदत वाढवावी लागली होती. जात पडताळणी समित्यांकडे प्रकरणे प्रलंबित राहणे, कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे आणि त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागणे, हीदेखील प्रक्रिया लांबण्याची कारणे आहेत.