चीनमध्ये चक्रीवादळ सौडेलचा तडाखा

भूस्खलनात दोघांचा मृत्यू, १० जण बेपत्ता

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
बीजिंग
tropical cyclone उष्णकटिबंधीय चक्रीवादळ सौडेलच्या प्रभावामुळे पूर्व चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर मोठे भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी १० जण अद्याप बेपत्ता आहेत. सरकारी माध्यमांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे सुमारे १२ घरांचे नुकसान झाले आहे.
 

tropical cyclone saudel triggers landslide in eastern china, 2 dead and 10 missing 
जिआंग्शी प्रांतातील सुइचुआन काउंटीमधील एका गावाच्या काही भागात शनिवारी सकाळी भूस्खलन झाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, आणखी भूस्खलन होण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता. अन्य दोन व्यक्तींना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असून, दोघांची प्रकृती ठीक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी प्रसारमाध्यम ‘सीसीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी बचाव कर्मचाऱ्यांनी बेपत्ता व्यक्तींपैकी आणखी एकाचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, चीनच्या सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’च्या माहितीनुसार, चक्रीवादळ सौडेलने २८ ऑगस्ट रोजी झेजियांग प्रांताला दोन वेळा धडक दिली होती. त्यानंतर गुरुवारी या वादळाने फुजियान प्रांतात उष्णकटिबंधीय वादळाच्या रूपात तिसऱ्यांदा किनारपट्टीवर धडक दिली.
झेजियांग आणि फुजियान हे दोन्ही प्रांत जिआंग्शीच्या शेजारी आहेत. ‘शिन्हुआ’च्या वृत्तानुसार, फुजियानमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. मात्र, बेपत्ता व्यक्तींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुतियान शहरातील हुआतिंग गावात १०० हून अधिक घरे कोसळल्याचेही समोर आले आहे.
मुसळधार पावसामुळे फुजियानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ‘शिन्हुआ’च्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एका बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आणि त्यानंतर पाण्याच्या वाढत्या दबावामुळे बंधारा फुटला. परिणामी अनेक गावांमध्ये पाणी शिरले आणि नागरिक अडकून पडले. परिस्थिती गंभीर होत असल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत फुजियानमध्ये समुद्रकिनारी तसेच जमिनीवरील जोखमीच्या भागांमधील सुमारे सहा लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
दरम्यान, अलीकडेच नेपाळमध्येही भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. या दुर्घटनेमुळे नदीचा प्रवाह काही प्रमाणात बाधित झाला होता. चीनमधील सध्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्याला वेग देण्यात आला असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.