नवी दिल्ली,
Vaibhav clashed with Tilak Varma दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात पूर्व विभाग (ईस्ट झोन) आणि दक्षिण विभाग (साऊथ झोन) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सामन्यादरम्यान साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा आणि ईस्ट झोनचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यात मैदानावरच शाब्दिक चकमक आणि वाद पाहायला मिळाला. ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची तुफान भागीदारी करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या आक्रमक फलंदाजीदरम्यान साऊथ झोनचा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या एका षटकात वैभवने दोन चौकार आणि एक षटकार लगावला, ज्यामुळे साऊथ झोनच्या खेळाडूंवर दबाव वाढला होता.

हा वाद ईस्ट झोनच्या डावातील ११ व्या षटकात उद्भवला. तिलक वर्मा सतत वैभवची लय बिघडवण्यासाठी त्याला स्लेजिंग करत होता आणि "काय यार, तो उपकर्णधार आहे" असे बोलून त्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळातच तिलकने वैभवजवळ जाऊन त्याच्या छातीवर थाप मारली, ज्यावर वैभवनेही मागे न हटता त्याला उत्तर दिले. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव वाढल्याचे पाहून पंचांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघांना वेगळे केले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने टी-२० शैलीत फलंदाजी करत ३७ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांचे योगदान दिले. त्याचा साथीदार अभिमन्यू ईश्वरन ७२ धावा करून धावबाद झाला, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शिखर मोहनने ८५ धावांची दमदार खेळी केली, मात्र त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. दुसरीकडे साऊथ झोनचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराज अत्यंत महागडा ठरला असून त्याने ११ षटकांत ७० धावा दिल्या आणि त्याला एकही बळी मिळवता आला नाही. ताज्या माहितीनुसार ईस्ट झोनने ५४ षटकांत ४ गडी गमावून २४६ धावांपर्यंत मजल मारली आहे.