सिराजसमोर वैभवची चौकारांची आतषबाजी!

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
चेन्नई,
vaibhavs barrage of fours against siraj दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात विजेतेपदासाठी सामना सुरू आहे. पूर्व विभागाचा कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि वैभव सूर्यवंशी व अभिमन्यू ईश्वरन या सलामीच्या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. वैभवने ३७ चेंडूंचा सामना करत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या.
 
vaibhav
 
या खेळीदरम्यान वैभवचा दक्षिण विभागाकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजविरुद्धचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. सिराजच्या गोलंदाजीवर वैभवने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. विशेष म्हणजे, सिराजविरुद्ध त्याने केवळ १२ चेंडूंमध्ये २२ धावा फटकावल्या. एका षटकात सलग तीन चौकार ठोकत वैभवने सिराजच्या गोलंदाजीवर दबाव निर्माण केला. त्याच्या संपूर्ण खेळीतला एकमेव षटकारही सिराजच्याच गोलंदाजीवर आला.
 
दक्षिण विभागाच्या संघात श्रीलंका दौऱ्यावरून परतलेला मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांचा समावेश आहे. दरम्यान, दुलीप ट्रॉफीतील या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या नजरा आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे असतील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीत होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी वैभव भारतीय संघाचा भाग असणार आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. मायदेशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळणार असल्याने वैभवच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.