We learned how to make tea from British भारतात चहा ब्रिटिशांनी आणला पण त्याला आपण इतका आपलासा केला की आपल्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होऊ शकत नाही. कोणाला तर बिछान्यावरच चहा लागतो.चिनी राजा शेन नुंग याला योगायोगाने चहाचा शोध लागला. ब्रिटिशांनी तो भारतात आणला. त्याची लागवड केली. चहा हा शब्दही चिनी भाषेतील ‘चा’या शब्दापासून आला आहे. भारतात आपल्या चहाचे ग्राहक तयार व्हावे म्हणून इंग्रजांनी भारतीयांना चहाची सवय लावली. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला रेल्वे स्टेशन्स आणि कामाच्या ठिकाणी फुकट चहा वाटला. तेव्हापासूनच भारतीयांना चहाचीच नाही तर फुकट चहा पिण्याची सवय लागली असावी. आजही कोणी फुकट चहा दिला तर, ‘‘क्या दोस्त है. दोस्ती हात मिलाने से नहीं चाय पिलाने से बढती है यार!’’ असे मनःपूर्वक दाद देणार.

चहा बनवणे आपण ब्रिटिशांकडून शिकलो. चहाची सुंदर किटली, नाजूक नक्षीदार कप आणि बशी, किटलीतला गरम गरम वाफाळता सोनेरी चहा प्रत्येकाने आपल्या कपात ओतायचा आणि त्यात हवी तेवढी साखर, हवे तेवढे दूध घालून चमच्याने हळुवार हलवायचा तो चहा काळा होईपर्यंत. इंग्रजांची चहा बनवण्याची राजस, दिमाखदार पद्धत आपल्याला काही मानवली नाही. आपण स्वतःची स्वतंत्र पद्धत तयार केली. विशेष म्हणजे प्रत्येक देशात, राज्यात, अगदी प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतंत्र पद्धत आहे. आपल्याकडे चहात आले आणि विलायची अगदी पाहिजेच. चहा करण्याला कोणी ‘चहा मांडला,’ कोणी ‘चहा टाकला’ म्हणतं, तर कोणी ‘चहा ठेवला’ म्हणतात. कपात चहाची पुडी सोडून ती हलवत बसून चहा करणे आपल्याला काही मानवले नाही. आपल्याला तयार चहा हातात लागतो.
चहाचे कडक मिठा चहा, निव्वळ दुधाचा चहा, लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी, हनी टी, काश्मिरी कहावा, बासुंदी चहा असे अनेक प्रकार आहेत. उरलेल्या बासुंदीचा चहा खरेच फक्कड लागतो. एकदा पिऊन पाहाच. पुण्यात तर ‘मारामारी’ नावाचा चहा प्रसिद्ध होता. हल्ली आरोग्यदायी म्हणून ‘माचा टी’ची क्रेझ आहे. पुण्यावरून एक किस्सा आठवला. पुण्यातला लक्ष्मी रोडवरच्या एका कपड्याच्या दुकानदाराला गिऱ्हाईकांना चहा द्यायचा नसला की तो दुकानातल्या कामगाराला, ‘‘नाना चहा आण’’, असे सांगायचा आणि ‘‘अण्णा चहा आण’’ असे सांगितले की तो कामगार चहा आणायचा. आपण चहा एवढा आपलासा केला की त्याची तुलना प्रत्यक्ष स्वर्गीय पेय अमृताशी केली. अनेकांसाठी चहा म्हणजे संजीवनी झाला. आपण त्याला आपल्या भावनांशी जोडले आहे. सुखात- दुःखात, आगत-स्वागतासाठी चहा हवाच. कोणाच्या घरी गेल्यावर चहा दिला नाही तर ‘‘काय खडूस माणूस आहे साधा चहा दिला नाही.’’ अशी संभावना होते. कपभर चहा मनोमिलन घडवून आणतो. चहा संवाद साधण्याचे छान माध्यम आहे. वधू परीक्षा, लग्नाची बोलणी, एवढेच नाही तर राजकीय चर्चा यशस्वी करण्यात चहा फार महत्त्वाचा!
‘‘शायद मेरे शादी का खयाल मन में आया है
इसी लिए मम्मी ने तुम्हे चाय पे बुलाया है’’ एकेकाळी तरुणाईच्या मनातील भावना व्यक्त करणारे हिंदी चित्रपटातील हे गाणे फार गाजले होते. आज चहा अनेकांच्या पोटापाण्याचे साधन बनला आहे. इंजिनीयर झालेले युवक सुद्धा चहाचा व्यवसाय करतात. चहाच्या दुकानांची नावे पूर्वी ‘रामभरोसे टी’, ‘भैरव चहा’, ‘काली माता चहावाला’ अशी मजेदार असायची. आज मात्र ‘प्रेमाचा चहा’, ‘आपला चहा’, ‘चहा आमचा आवड तुमची’, ‘फक्कड चहा’, अशी ग्राहकांना आकर्षित करणारी नावे आहेत. एकदा प्रवासात एका खेडेगावात चहाच्या टपरीवर ‘हेमामालिनी चहा’अशी पाटी वाचली होती. आपल्या देशात चहा हे आदरातिथ्याचे प्रतीक झाले आहे. कोणत्याही कार्यक्रमात उपस्थितांचे चहाने स्वागत केले जाते किंवा चहाने निरोप दिला जातो. हल्ली महागाईमुळे चहाच्या कपाचा आकार फारच छोटा झाला आहे. एका कार्यक्रमात अर्ध्या बोटाएवढा चहाचा कप पाहून माझी चहाबाज मैत्रीण म्हणाली, ‘‘केवढासा तो कप आणि त्यातला केवढासा तो चहा! या चहाने वरचा ओठ ओला होतो आणि खालचा ओठ कोरडाच राहतो. काही दिवसांनी चहापानाच्या कार्यक्रमात तीर्थसारखा पळीभर चहा हातावर टाकतील.’’ तिच्या या टीकेवर आम्ही बराच वेळ हसत होतो.
आमच्या पूर्वीची पिढी दिवसाची सुरुवात दीड कप चहाने करायची. सकाळचा चहा दीड कप हवा, असा अलिखित नियम होता. घरातल्या पुरुषांना तर पहिला कपभर चहा संपताच पुन्हा अर्धा कप चहा कपात लागायचा आणि तो जर लगेच मिळाला नाही तर, ‘‘अरे चहा आण लवकर. माझा चहा संपला आणि अजून तू चहा दिला नाही.’’ पुढचा चहा कपात पडेपर्यंत यांचा जीव टांगणीला लागणार. कधी गृहिणीचा अंदाज चुकलाच आणि चहा कमी पडला तर... पुढचा चहा कपात पडेपर्यंत यांच्या जीवाची अशी काही तगमग व्हायची की चहा करणारीला आपल्या हातून खूप मोठी चूक झाली, असे वाटून ती बिचारी ओशाळवाणी व्हायची. घरी भेटायला आलेल्यांनाही आग्रहाने ‘घ्या हो थोडा’ म्हणून आणखी अर्धा कप चहा दिला जाई. आता साखरेचे भाव वाढले, दुधाचे भाव वाढले त्यामुळे दहा रुपयाला मिळणारा चहा आता पंधरा रुपये झाला आहे. त्यामुळे दीड कप चहा तर... बहोत दूर की बात बन गया है!
अरुंधती वैद्य
९४२०३९७५५९