मंगरूळनाथ,
wet and dry waste शहरात नगरपालिकेकडून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचा दावा केला जात असला तरी या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम प्रकल्पच उपलब्ध नसल्याने संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मंदिरांमधील निर्माल्य,अर्पण केलेली फुले,ओली पाने तसेच भाजीपाला आणि इतर ओला कचरा घंटा गाड्यांमधून संकलित केल्यानंतर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी मिळेल त्या जागेवर किंवा उकिरड्यावर टाकला जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते.

त्यामुळे कचरा संकलनाच्या नावाखाली केवळ औपचारिकता सुरू आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ओला आणि सुका कचरा घराघरातून वेगवेगळा घेण्याचे उद्दिष्टच मुळात कचर्याचे वर्गीकरण करून त्यावर पुनर्वापर, पुनर्चक्रण व शास्त्रोक्त प्रक्रिया करणे हे आहे. मात्र, संकलनानंतर दोन्ही प्रकारच्या कचर्याची योग्य प्रक्रिया होत नसेल, तर नागरिकांनी केलेले वर्गीकरण आणि नगरपालिकेने केलेले स्वतंत्र संकलन याचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः मंदिरांमधून मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्या निर्माल्यापासून खत किंवा अन्य उपयुक्त पदार्थ तयार करण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यामुळे ओला-सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने उभारावा आणि कचरा व्यवस्थापनातील या विस्कळीत कारभाराची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.