मशिदीखाली सापडली १.५ मीटर रुंद विहीर!

कटरने जड स्लॅब कापून उघडकीस आणले गूढ; तपासाला वेग

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
सहारनपूर.
wide well found beneath the mosque उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधलेली बेकायदेशीर दोन मजली मशीद पाडल्यानंतर एक खळबळजनक बाब समोर आली आहे. कारवाईनंतर २४ तासांनी ढिगारा हटवण्याचे काम सुरू असताना त्याखाली १५ फूट खोल आणि १.५ मीटर रुंद अशी एक विहीर आढळून आली. या विहिरीवर एक अत्यंत जड स्लॅब ठेवण्यात आला होता, जो पोकलेन मशीननेही तुटत नव्हता. अखेर कटरच्या साहाय्याने हा स्लॅब कापून काढल्यानंतर ही विहीर उघडकीस आली. मात्र, ही विहीर नेमकी किती जुनी आहे आणि कधी बांधली गेली होती, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही.
 
 
 
wide well found beneath the mosque
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून ही मशीद बांधण्यात आल्याचा आरोप बजरंग दलाचे माजी राज्य संयोजक विकास त्यागी यांनी जानेवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला होता. या तक्रारीच्या चौकशीनंतर २४ मार्च २०२५ रोजी उत्तर प्रदेश सार्वजनिक जागा (अनधिकृत ताबाधारकांना निष्कासित करणे) अधिनियम, १९७२ अंतर्गत शहर दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. शहर दंडाधिकाऱ्यांनी १६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात ही जमीन राज्य सरकारच्या ३१५ चौरस मीटर क्षेत्राची असून १३२४ आणि १३५९ या पीक वर्षांमध्ये 'कचरी-जिल्हाधिकारी' म्हणून नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने ही इमारत बेकायदेशीर घोषित करत ताबाधारकाकडून ६,४१,६५,५०० रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले होते.
 
या आदेशाविरोधात मशिदीच्या बाजूने २० जुलै रोजी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अपील करण्यात आले होते. दीड महिना चाललेल्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाने २ सप्टेंबर रोजी हे अपील फेटाळून लावत शहर दंडाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. या आदेशानंतर पोलीस प्रशासनाने शुक्रवारी रात्री संपूर्ण परिसराला वेढा घालत कडक बंदोबस्त तैनात केला आणि शनिवारी पहाटे सात बुलडोझरच्या साहाय्याने ही बेकायदेशीर दोन मजली इमारत पूर्णपणे जमिनीदोस्त केली. सध्या पोलीस आणि प्रशासन या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या विहिरीबाबत अधिक तपास करत आहे.