अनिल कांबळे
नागपूर,
wife murdered in mankapur मानकापूर परिसरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. औषध घेतल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा पतीने केला होता. शवविच्छेदन अहवालातून मात्र तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. यामिनी कृष्णकांत यादव (वय ३८, रा. गोविंद सिटी, साईनगर) असे मृत पत्नीचे तर कृष्णकांत यादव (वय ४१) असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री यामिनी यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये पती कृष्णकांत यांनी दाखल केले. पहाटे ३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटना संशयास्पद असल्याने पोलिसांनी यामिनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. गुरुवारी अहवाल प्राप्त झाला. त्यातून गळा दाबल्याने यामिनी यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाली आणि पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पुढे आलेल्या माहितीवरून पती कृष्णकांतविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या चौकशीत कृष्णकांतने नाट्यमय घटनाक्रम कथन केला. त्यानुसार, रात्री साडेनऊ वाजता कामावरून परतलो. पत्नीला जेवण मागितले. मात्र, दारूच्या नशेत असल्याने पत्नीने वाद घालत जेवण देण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी पत्नीला दोन-तीन थापडा मारल्या, दोघांमध्ये झटापटही झाली. त्यानंतर पत्नीला पलंगावर ढकलून औषधे आणण्यासाठी बाहेर गेलो. परतेपर्यंत पत्नीची प्रकृती बिघडली होती. मुलांनी आईने गोळी घेतल्याचे सांगतले. त्यावरून यामिनी यांना शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करीत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.