दुबई,
womens t20 asia cup 2026 महिला टी-२० आशिया कप २०२६ मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय महिला संघाने ७ गडी राखून हे लक्ष्य सहज गाठत सामन्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले. या पराभवानंतर पाकिस्तानसमोर आता उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी गटातील अखेरचा सामना जिंकण्याचे आव्हान आहे. मात्र, भारताकडून झालेल्या या दारुण पराभवानंतरही पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत नाही.

पाकिस्तान महिला संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वहाब रियाझ यांनी सामन्यानंतर संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. मोठ्या पराभवानंतरही पाकिस्तानकडे आशिया कप जिंकण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला. रियाझ यांच्या मते, सामन्याच्या दिवशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती आणि त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकीचा नव्हता. मात्र, मोठ्या सामन्याचा दबाव खेळाडूंना योग्य प्रकारे हाताळता आला नाही आणि त्याचा फटका संघाला बसला.
पाकिस्तानी खेळाडूंच्या मानसिक तयारीवर पुढील काळात विशेष लक्ष देणार असल्याचेही वहाब रियाझ यांनी स्पष्ट केले. भारताविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांवर चर्चा करून त्या चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. संघातील खेळाडू प्रतिभावान असून त्यांना केवळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, असा रियाझ यांचा दावा आहे. पाकिस्तानचा पुढील सामना हाँगकाँगविरुद्ध होणार असून, त्यापूर्वी भारताविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका समजून घेण्यावर संघाचा भर राहणार आहे.