बँक ऑफ बडोदात ११०० नोकऱ्या!

पगार ६७ हजारांपासून पुढे...

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
1,100 jobs at Bank of Baroda सरकारी बँकेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बडोदाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेने वेल्थ एक्झिक्यूटिव्ह आणि क्रेडिट अनालिस्ट या पदांवर एकूण ११०० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २४ सप्टेंबर २०२६ आहे. उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.या भरतीमध्ये सर्वाधिक १००० जागा वेल्थ एक्झिक्यूटिव्ह पदासाठी आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ३२ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे तसेच इन्श्यूरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे IC 38 प्रमाणपत्र किंवा NISMने निश्चित केलेल्या प्रमाणपत्रांपैकी एक वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी तसेच वित्त, मार्केटिंग, बँकिंग आणि एबीए क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
 
 

1,100 jobs at Bank of Baroda 
 
क्रेडिट अनालिस्ट पदासाठी एकूण १०० जागा उपलब्ध आहेत. ही नियुक्ती कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागासाठी केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवार पदवीधर असण्यासोबतच चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए असणे आवश्यक आहे. याशिवाय शेड्यूल्ड कमर्शियल बँकेत किमान १ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३३ वर्षांदरम्यान असावे.अर्ज शुल्काचा विचार करता, खुला प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. या पदांसाठी पगाराची सुरुवात ६७ हजार रुपयांपासून होत असल्याने सरकारी बँकेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जाऊन Careers विभागातील Current Opportunities हे पेज उघडावे. त्यानंतर संबंधित भरतीची लिंक निवडून नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जातील आवश्यक माहिती भरून पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि रिझ्यूम अपलोड करावा. शेवटी ऑनलाइन अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.