अभिनय बेर्डेचा मोठा निर्णय; अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत सुरू करणार स्टार्टअप

चाहत्यांकडे मागितल्या भन्नाट कल्पना

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
मुंबई
abhinay berde दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय त्याने घेतला असून, या काळात स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचा विचार असल्याचं त्याने सांगितलं आहे. मात्र, स्टार्टअपसाठी अद्याप त्याच्याकडे ठोस कल्पना नसल्याने त्याने थेट चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
 

abhinay berde takes career break to start a startup, asks fans for ideas 
‘मी करिअरमधून ब्रेक घेतोय. पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा,’ असं कॅप्शन देत अभिनयने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओची सुरुवात करतानाच अभिनयने हा व्हिडीओ शेअर करण्यामागचं कारण वेगळं आणि महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. “मी माझ्या करिअरमधून थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलंय,” असं त्याने म्हटलं. मात्र, हा निर्णय अभिनय क्षेत्रापासून कायमचं दूर जाण्यासाठी नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. उलट, स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपण करिअरमधून काही काळ ब्रेक घेत असल्याचं त्याने सांगितलं.
मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासोबतच आता व्यवसायाच्या जगातही काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याची अभिनयची इच्छा असल्याचं त्याच्या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. मात्र, स्टार्टअप नेमकं कोणत्या क्षेत्रात सुरू करायचं, याबाबत त्याच्याकडे अद्याप निश्चित कल्पना नाही. त्यामुळे त्याने आपल्या फॉलोअर्सना या नव्या प्रवासात सहभागी करून घेत त्यांच्या कल्पना मागवल्या आहेत.
“काही आऊट ऑफ द बॉक्स, क्रेझी आयडियाज तुमच्याकडे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा,” असं आवाहन अभिनयने चाहत्यांना केलं आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांकडून आलेली एखादी कल्पना त्याला आवडल्यास त्या व्यक्तीसोबत काम करण्याची संधीही तो देणार आहे. “तुम्हाला मी कोलॅब रिक्वेस्टसुद्धा नक्की पाठवेन,” असं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे अभिनयचा हा व्हिडीओ केवळ स्टार्टअपसाठी कल्पना मागणारा नसून, त्याच्या नव्या प्रवासात चाहत्यांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे.
अभिनयच्या या पोस्टवर त्याची बहीण स्वानंदी बेर्डे हिनेही मजेशीर कमेंट केली आहे. ‘भावा, माझ्यामध्ये गुंतवणूक कर’, असं तिने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तिच्या या कमेंटनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेणाऱ्या अभिनयने आता व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या आगामी योजनांकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अभिनयला कमेंट्सच्या माध्यमातून कोणकोणत्या भन्नाट व्यावसायिक कल्पना मिळतात आणि त्यापैकी एखादी कल्पना प्रत्यक्षात स्टार्टअपचं रूप घेते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.